पुणे, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अजित पवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण अजित पवार यांनी मागील काही दिवसांत केलेल्या कृतीबाबत विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केले. पक्षात फूट पडलेली नाही मग अजित पवारांविरोधात विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार का केली आहे, या प्रश्नाचे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले नाही. राष्ट्रवादीत फूट पडली नाही तर प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची प्रक्रिया का राबवली जात आहे, यावर पक्षात अनेक गोष्टी दैनंदिन कामाचा भाग म्हणून सुरू आहेत असे मोघम उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
अजित पवार आणि त्यांचे समर्थक शिंदे सरकारसोबत आहेत. अजित पवार आणि त्यांचे निवडक समर्थक शिंदे सरकारचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी भाजपासोबत जाणार का, असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी लगेच उत्तर दिले. राष्ट्रवादीची भाजपासोबत आघाडी अशक्य असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची वक्तव्ये
राष्ट्रवादीत फूट नाही
अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते
अजित पवारांची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे
राष्ट्रवादीची भाजपासोबत आघाडी अशक्य
राज्य शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष