Bihar Cabinet Expansion : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले असून यावेळी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. नेहमीप्रमाणे गृहखाते स्वतःकडे ठेवण्याची परंपरा मोडत नितीश कुमार यांनी यंदा हे महत्वाचे खाते आपल्या उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या ताब्यात दिले आहे. यामुळे बिहारच्या सत्ता समीकरणात महत्त्वाचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे की नितीश कुमार मुख्यमंत्री असताना गृहखात्यापासून दूर राहणार आहेत. महाआघाडी सरकार असो किंवा एनडीएची मागील कार्यकाळात नितीश कुमार यांनी गृहखाते कधीच इतरांकडे दिले नव्हते.
भाजप कोट्यातील मंत्र्यांना खातेवाटप
तथापी, जेडीयू कोट्यातील मंत्र्यांना अद्याप विभागांची जबाबदारी दिलेली नाही. दुसरीकडे भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांना त्यांची खाती सोपवण्यात आली आहेत. एलजेपी(आर), एचएएम आणि आरएलएम या सहयोगी पक्षांच्या मंत्र्यांची विभाग यादीही जाहीर झाली आहे.
कोणाकडे कोणती मंत्रालये?
बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे जमीन आणि महसूल विभाग आणि खाण आणि भूगर्भशास्त्र विभाग असेल. मंगल पांडे यांची पुन्हा आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते मागील सरकारमध्ये आरोग्य मंत्री देखील होते. पांडे यांच्याकडे कायदा मंत्रालय देखील असेल. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्याकडे उद्योग विभागाची जबाबदारी असेल.
कृषीमंत्रीपदी राम कृपाल यादव
दरम्यान, बिहारच्या कृषी क्षेत्राची जबाबदारी आता राम कृपाल यादव यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, नितीन नवीन यांना रस्ते बांधकाम विभाग आणि नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयानंतर हे तिन्ही विभाग कोणत्याही सरकारमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जातात.