पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्याचाच प्रत्यय देणारी कृती पुण्यात पाहायला मिळाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या पाहणीसाठी आलेल्या गडकरी यांनी वाहनांचा मोठा ताफा टाळत थेट बसने प्रवास केला. त्यांच्या या साध्या आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची पाहणी केली. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी थांबत त्यांनी कामांचा आढावा घेतला आणि ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जेजुरीमध्ये आगमन होताच पारंपरिक पगडी परिधान करून गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी भंडारा उधळत “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपूर दौऱ्यावर येत असून पुणे ते पंढरपूर दरम्यान पालखी मार्गावरील दिवेघाट, जेजुरी, फलटण, नातेपुते वेळापूर, वाखरी आणि वाखरी ते पंढरपूर दरम्यानच्या कामाचा आढावा घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचंदर्शन घेणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारी मार्गाची पाहणी करत असताना नकाशा आणि रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत आहे.