मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार आणि आक्रमक भाषण करत विरोधकांवर सडकून टीका केली. “भारतीय जनता पक्षाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, तर 16 तारखेला येणारी सकाळ आमचीच असेल,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. हिंदू समाजाला भडकवणे, हिंदू मतांमध्ये फूट पाडणे हे प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून, त्याचा सर्वाधिक फटका आज हिंदू समाजालाच बसल्याचे राणे यांनी नमूद केले.
नितेश राणे यांनी एका अहवालाचा हवाला देत मुंबईतील हिंदू लोकसंख्या सातत्याने कमी होत असल्याचे सांगितले. ही बाब गंभीर असून, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदान करताना मतदारांनी केवळ भावनिक आवाहनांना बळी न पडता, उमेदवार कोण आहे, त्याच्या पाठीमागे कोण आहे आणि तो आपल्या भागासाठी कोणती विकासकामे करू शकतो, याचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
भाषणादरम्यान नितेश राणे यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या कामगिरीचाही विशेष उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. मुंबईतील अनेक विकासविषयक निर्णयांमध्ये प्रवीण दरेकर यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, विकासाच्या महत्त्वाच्या निर्णयांवर अंतिम सही ही मुख्यमंत्र्यांचीच असते, हे मतदारांनी लक्षात ठेवावे, असे सांगत राणे म्हणाले की, “जर कोणी विकासाच्या नावावर तुमच्याकडे मत मागायला आला, तर त्याला स्पष्ट सांगा की राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच आहे.”
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. “आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहोत. आम्ही कोणतेही ‘चायनीज शिवसैनिक’ नाही. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार अंगावर आले, तर शिंगावर घेण्याची आमची परंपरा आहे,” असे ते म्हणाले.
उत्तर भारतीयांनाही त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. “मुंबईच्या विकासाची भाषा करायची असेल, तर आधी मराठी भाषा शिका. मराठीचा सन्मान ठेवा, मगच मुंबईच्या विकासावर बोला,” असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईच्या विकासावर बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवरही टीका केली. संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवर निशाणा साधत ते म्हणाले की, “ही विकासाची नाही, तर फिक्सिंग मुलाखत होती.” त्यांनी संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक पातळीवरही टीका करत, “मांजरेकर हे साडेसातनंतर बसणारे अभिनेते आहेत, तर संजय राऊतांना ठाकरे बंधूंशिवाय दुसरे कोणतेही काम नाही,” अशी खोचक टिप्पणी केली.
नितेश राणे यांनी ठामपणे सांगितले की, मुंबईचा महापौर हा महायुतीचाच आणि मराठीच असणार आहे. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना बाजूला ठेवून, केवळ अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विचार सोडले,” असा आरोप त्यांनी केला.
एकूणच, नितेश राणे यांच्या या भाषणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आक्रमक पवित्रा घेऊन मैदानात उतरण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.