नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसने बँका अडचणीत आणल्या, मोदी सरकार बँका सावरत आहे; असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे वक्तव्य केले.
काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव लोकसभेत सादर केला आहे. या प्रस्तावावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसवर टीका केली. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. इंग्लंड आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेले देश आर्थिक संकटातून जात आहे. चीनच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावला आहे. पण भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. भारताची अर्थव्यवस्था २०२२-२३ मध्ये ७.२ टक्क्यांची गतीने प्रगती करत होती. यंदाच्या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्यांनी प्रगती करत आहे. कोरोना संकटातून सावरत भारताने आर्थिक प्रगती केली आहे.
काँग्रेसने ६ दशके ‘गरीबी हटाव’ ही घोषणा दिली. पण गरीबी दूर केली नाही. मोदी सरकार आल्यावर अनेक जनहिताच्या योजना राबवण्यात आल्या. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी २०१४ मध्ये ३.९ लाख कोटी रुपये तर आता १०.९ लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. देशाचे कृषी बजेट २०१४ मध्ये २१ हजार ९३३ कोटी रुपये होते. आता कृषी बजेट १ लाख २५ हजार कोटी रुपयांवर गेले आहे. भारताची परकीय गंगाजळी २०१४ मध्ये ३१३ अब्ज होती. जून २०२३ अखेरीस भारताची परकीय गंगाजळी ६०० अब्जांवर पोहोचली आहे. देशाची संरक्षण उत्पादनांची निर्यात २०१४ मध्ये १९४१ कोटी रुपये होती, आता ही निर्यात १६ हजार कोटींवर जाऊन पोहोचली आहे. यूपीए सरकारच्या काळात मातृत्व मृत्यू दराच्या बाबतीत भारताचे रँकिंग १६७ एवढे वाईट होते. पण आता मातृत्व मृत्यूचे प्रमाण कमी झाले आणि या क्षेत्रातील देशाचे रँकिंग ९७ वर आले आहे. भारताचा भर उच्च विकासदर आणि कमी महागाई दर यावर आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. लोकसभेसाठी २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील नागरिकांनी काँग्रेसवर अविश्वास दाखवला आणि २०२४ च्या निवडणुकीत याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला.
यूपीएने नाव बदलले आहे पण त्यांचे भ्रष्टाचार, स्वार्थ साधण्याची वृत्ती, निवडक व्यक्तींचे भले करणे ही प्रवृत्ती बदललेली नाही. नाव बदलले असले तरी या आघाडीत अंतर्गत कलह सुरू आहे. पंजाब आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यात संघर्ष सुरू आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस तर राजस्थान आणि हिमाचलमध्ये काँग्रेस पक्षातच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. विरोधक सत्तेत होते त्यावेळी पंतप्रधानपदासाठी राज्यसभेतून नेत्याला आयात करावे लागले होते. सध्या थेट लोकांमधून निवडून आलेली व्यक्तीच पंतप्रधान आहे. देशाची प्रगती होत आहे आणि दिसत आहे. आर्थिक बाबतीत घोडदौड सुरू आहे. काँग्रेसने बँका अडचणीत आणल्या, मोदी सरकार बँका सावरत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. काँग्रेसच्या काळात मिळणार असे म्हणायचे आणि आता मिळाले आहे असे सांगितले जाते; असेही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
३ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक आहे
टोमॅटोची खरेदी करून एनसीसीएफ, नाफेड यांच्या माध्यमातून विक्री सुरू आहे
नेपाळमधून टोमॅटो आयात करण्यात येत आहेत
लवकरच टोमॅटोचा दर ८५ रुपये किलोवर येईल