मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत असून, मोठ्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राणे – ठाकरे वाद पुन्हा एकदा पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेना (शिंदे गट) नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “ठाकरे गटाकडे सक्षम आणि ताकदीचे उमेदवार उरलेले नाहीत,” असा आरोप करत त्यांनी म्हटले की, अनेक ठिकाणी इच्छुक नसतानाही उमेदवारांना बळजबरीने उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेच राज्यभरात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
निलेश राणे म्हणाले की, “ठाकरे गटामध्ये सध्या धरून – पकडून उमेदवारी देण्याचा प्रकार सुरू आहे. ताकदीचे उमेदवार नसल्यामुळे जबरदस्तीने उमेदवारी देण्यात येत आहे. अनेक उमेदवारांना स्वतःलाही माहिती नाही की त्यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.”
या प्रक्रियेमुळेच अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “उमेदवारांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे की त्यांच्या पंचक्रोशीत विकास कोण करू शकतो, निधी आणि पैसा कोण आणू शकतो. त्यामुळेच ते आमच्याकडे वळत आहेत,” असा दावा निलेश राणे यांनी केला.
याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की, “आम्ही कधीही कुणाला फोन करून किंवा दबाव टाकून आमची उमेदवारी दिलेली नाही. एकही असे उदाहरण दाखवता येणार नाही. स्वखुशीने लोक आमच्याकडे येतात आणि आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.