पावसाने अखेर मुंबईसह पालघर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. कालच मुंबईसह पालघरमध्ये तुरळक सरी कोसळल्या. मात्र, आज सकाळपासून पावसाने ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली. त्यामुळे ऐन सकाळी पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. छत्री आणि रेनकोटशिवाय कामावर निघालेल्या चाकरमान्यांना भिजतच जावे लागले. तर, पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवारी मुंबईत हलक्या सरी कोसळल्याने काहीवेळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पण नंतर पाऊस गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला. मात्र, आज सकाळीच मुंबईसह कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, विलेपार्ले या उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मुंबईत पावसाने हजेरी लावली असली तरी कुठेही पाणी साचलेले नाही. मात्र, सकाळी सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.