राष्ट्रवादी काँग्रेसचे आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ओबीसी नेत्यांची हजेरी लागली असून राष्ट्रवादीचे बडे नेते ओबीसी अधिवेशनाला उपस्थित होते.
या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री अदिती तटकरे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे उपस्थित राहिले.
दरम्यान, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघीड सरकारची भूमिका कायम आहे. मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, काल मनसेकडून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्यासोबतचा फोटो ट्विट करण्यात आला. मात्र, त्या फोटोचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. शरद पवार हे राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत तर बृजभूषण सिंह हेसुद्धा भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्य आहेत. त्यामुळे मनसेने केलेला आरोप चुकीचा असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले आहे.