नाशिक : फडणवीस मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांचे पत्ता कट करण्यात आल्याचं आपण पहिलंय. उशिरा का होईना मंत्रिमंडळ विस्तार होऊन खातेवाटप देखील जाहीर झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना देखील यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. ही ताकद कायम ठेवण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यापुढे आहे. भुजबळ यांना शह देण्यासाठी पहिल्यांदाच मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटे यांना कृषी यासारखं महत्त्वाचं खातं देऊन कोकाटे यांची ताकद वाढवली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहावा, असा अजित पवारांचा प्रयत्न आहे.
छगन भुजबळ यांना वगळून नाशिकला तीन मंत्रीपद देणे आणि त्यात माणिकराव कोकाटे यांना महत्त्वाचे कृषी खाते मिळणे हा भुजबळांना शह देण्याचे प्रयत्न तर नाही अशी शंका कार्यकर्ते किंवा नागरिकांच्या मनात निर्माण होऊ शकते असे राजकीय विश्लेषक संपत देवगिरी यांनी म्हटले आहे. माणिकराव कोकाटे यांना कृषी खाते देऊन राष्ट्रवादीने भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
महायुतीकडे प्रचंड संख्याबळ आणि ताकद आहे. अशा परिस्थितीत भुजबळांच्या भूमिकेचा सन्मान करणे सगळ्यांचीच जबाबदारी होती. याची जास्त जबाबदारी अजित पवारांची होती. कारण राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांना वैचारिक आणि राजकीय बळ देण्याचे काम भुजबळांनी केले होते. त्याची परतफेड त्यांच्या शेवटच्या काळात ठेवणे गरजेचे होते. भुजबळांवर अन्याय झाला आहे. याचे आत्मपरिक्षण अजित पवारसह राष्ट्रवादी आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : बीड पालकमंत्रीपदाचा मुद्दा गाजणार
माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. भुजबळ मंत्री असताना अनेकदा माणिकराव कोकाटे आणि भुजबळ यांच्यामध्ये खटके उडाल्याच्या अनेक घटना आहेत. माणिकराव कोकाटे एक आक्रमक मराठा चेहरा आहे, त्यामुळेच हे हत्यार अजित दादा यांनी भुजबळ यांच्याविरुद्ध वापरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.. मात्र, माणिकराव कोकाटे यांनी आपले भुजबळांशी कोणताही वाद नसल्याचे सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मला वाटतं भुजबळांनी पंतप्रधान व्हावं
मला वाटतं भुजबळांनी पंतप्रधान व्हावं. पण असं होऊ शकतं नाही. जशी मागणी असते. त्याप्रमाणे पक्ष नेतृत्वाला विचार करावा लागतो. मी ही पाच टर्म वाट पाहिली आहे असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून छगन भुजबळ यांचे नाशिक जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व राहिलं आहे.. मात्र, यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यावर असलेली राष्ट्रवादीची ताकद आणि वर्चस्व कायम ठेवतात का? आणि भुजबळांना कसा शह देतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.