Vidhan Parishad Election 2026: राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एका जागेसाठी मध्यरात्रीपर्यंत खलबतं; पार्थ पवारांच्या जिगरी यारला उमेदवारी मिळणार?

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून तणाव वाढला आहे

Vidhan Parishad Election 2026: राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एका जागेसाठी मध्यरात्रीपर्यंत खलबतं; पार्थ पवारांच्या जिगरी यारला उमेदवारी मिळणार?

मुंबई: राजकारणात रात्रीच्या वेळी होणाऱ्या बैठका अनेकदा सकाळच्या राजकीय भूकंपाची नांदी ठरतात. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशाच एका मध्यरात्रीच्या 'मॅरेथॉन' बैठकीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार वाट्याला आलेल्या अवघ्या एका जागेसाठी पक्षात मोठी रस्सीखेच सुरू असून, उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याचा सस्पेन्स आता शिगेला पोहोचला आहे.

मंगळवारी (28 एप्रिल 2026) रोजी रात्री 11 च्या सुमारास 'देवगिरी' या निवासस्थानी सुरू झालेली ही बैठक तब्बल मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत ही अत्यंत गोपनीय आणि महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक नावांवर सविस्तर खल झाला, ज्यामध्ये काही अनपेक्षित नावांचीही चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

या बैठकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांची उपस्थिती. विक्रम हे खासदार पार्थ पवार यांचे बालपणीचे मित्र मानले जातात. साहजिकच, त्यांच्या नावाचा विचार या बैठकीत प्राधान्याने झाला. मात्र, विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत वर्तुळातूनच कडाडून विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे. या वाढत्या विरोधामुळे पक्ष नेतृत्वाला पर्यायी नावांचा गांभीर्याने विचार करावा लागत आहे. परिणामी, राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांसारख्या तगड्या नेत्यांच्या नावांवरही काल रात्री मंथन करण्यात आले.

हेही वाचा: Crude Oil Price: युएईची 'ओपेक'ला सोडचिठ्ठी; भारताचे टेन्शन वाढणार, OPEC म्हणजे काय?

चर्चेत असलेल्या नावांपैकी झिशान सिद्दीकी हे पक्षातील एक महत्त्वाचे आणि तरुण नेतृत्व आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्यांचे राजकीय वजन आणि अल्पसंख्याक चेहऱ्याची उपयोगिता पक्ष ओळखून आहे. दुसरीकडे, राजेंद्र जैन हे माजी विधान परिषद आमदार असून ते प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या अनुभवी आणि युवा नेत्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार, विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची स्पष्ट राजकीय गणिते आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारी ही 'एकच' जागा असल्यामुळे पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर, आज (बुधवारी) सकाळी पुन्हा एकदा 'देवगिरी'वर कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या निर्णायक बैठकीसाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल या कोअर कमिटीसमोर ठेवून, आजच्या बैठकीत उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्यास नाराजी ओढवून घेण्याचा धोका असल्याने पक्षश्रेष्ठी अत्यंत सावध पावले उचलत आहेत. त्यामुळे आता 'देवगिरी'वरून नक्की कोणाच्या नावावर मोहोर उमटते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Pune Crime News : तब्बल 16 राऊंड फायर, गोळी थेट डोक्यात….; देहूरोडमध्ये रक्तरंजित शेवट, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number