राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. उमेश पाटील यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पलटवार केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचंही थेट नाव घेणं टाळलं. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा रोख राष्ट्रवादीतील काही राजकीय घडामोडींकडे असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. थेट नाव घेऊन आरोप करण्याऐवजी उमेश पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भूमिका मांडल्याने रुपाली ठोंबरे पाटील यांनी ते घाबरल्याचा दावा केला. या आरोपाला उमेश पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं. आपण कोणालाही घाबरत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या राजकीय जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आणि पक्षावर मोठी जबाबदारी आली असून, सुनेत्रा पवार यांच्यावरही अचानक मोठ्या जबाबदाऱ्या आल्याचं त्यांनी म्हटलं.