विधान परिषदेसाठी महायुतीचा तिढा सुटला असून पुण्याची जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहे. अशातच विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असताना पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. रविवारी रात्री 'जिजाई' निवासस्थानी नेत्यांची तातडीची बैठक बोलवली गेली होती. तब्बल पाच तास झालेल्या चर्चेनंतर पुणे विधानपरिषदेसाठी विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर पुण्यातील जिजाई बंगल्यात विक्रम काकडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेतली असून विक्रम काकडे आज अर्ज भरणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि मतदार संघावरील पारंपारिक वर्चस्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्याची जागा राष्ट्रवादीकडेच कायम ठेवावी अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे भाजपने या जागेवर दावा सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुंबई दिल्ली येथे झालेल्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर पुणे आणि कोकण या दोन्ही जागा राष्ट्रवादीला देण्याचे महायुतीत ठरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुनील टिंगरे, दीपक मानकर, विक्रम काकडे यांच्यासह पिंपरी चिंचवड मधून संदीप वाघेरे, विलास लांडे, नाना काटे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर तर पुणे जिल्ह्यातून रणजीत शिवतारे, दिलीप मोहिते, रमेश थोरात ,आदि नेत्यांची उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरु होती. त्यानंतर आता अखेर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार ठरला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आज विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेचे कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीकडे रवाना झाले असून सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक असलेले महेंद्र थोरवे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीकडे निघाल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.