Ajit Pawar: राष्ट्रवादी पुन्हा एकत्र! पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची मोठी घोषणा, घड्याळ आणि तुतारी लढणार एकाच मैदानात

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार आहेत.

Ajit Pawar: राष्ट्रवादी पुन्हा एकत्र! पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची मोठी घोषणा, घड्याळ आणि तुतारी लढणार एकाच मैदानात

Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा घडामोड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महापालिका निवडणुकीसाठी युती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची अधिकृत घोषणा खुद्द अजित पवार यांनी जाहीर सभेत केली. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचं चित्र आहे.

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे दोन्ही चिन्हे एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरतील. हा परिवार पुन्हा एकत्र येत असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं.

हेही वाचा:Pune Election 2026: भाजपमध्ये घराणेशाहीला चाप; निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांचा पत्ता कट

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील नेत्यांमध्ये सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरू होता. या चर्चांदरम्यान युती फिस्कटल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र अखेर पिंपरी-चिंचवडपासून युतीला सुरुवात होणार असल्याचं जाहीर झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे शहरातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असून याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

आपल्या भाषणात अजित पवार यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. “माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. पण सध्या दबाव, धमक्या आणि दमबाजीचं राजकारण सुरू आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढल्याचं सांगत त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा:Ajit Pawar NCP Candidate List : मुंबईत अजित पवारांचा 'एकला चलो रे'चा नारा ! 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

अजित पवार म्हणाले की, एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका आज कर्जबाजारी झाली आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. 1992 ते 2017 या काळात महापालिका चालवताना कधीही कर्ज काढावं लागलं नव्हतं, असं सांगत त्यांनी त्या काळातील प्रशासनाचा उल्लेख केला.

महापालिका निवडणुका उशिरा झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 2017 नंतर 2022 मध्ये निवडणुका होणं अपेक्षित होतं, मात्र विविध कारणांमुळे त्या लांबवल्या गेल्याचं त्यांनी नमूद केलं. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना दबावाला न घाबरता मतदान करण्याचं आवाहन केलं.

या युतीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number