काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काल दिल्ली दौऱ्यावर होत्या जिथे त्यांनी आणि पार्थ पवारांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यावांसोबत बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे माजी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय इतर भाजप पक्षश्रेष्ठ्यांची उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी भेट घेतली. यावेळी पक्षाचे कारभारी समजले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुनेत्रा पवार यांच्यासोबत कुठे दिसले नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काल रात्रीच राजधानी दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाल्या होत्या. यानिमित्ताने भाजप पक्षश्रेष्ठीसोबत सुनेत्रा पवार राजकीय खलबतं करण्याची शक्यता वर्तावली जात होती.
अशातच सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रिफ यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच हसन मुश्रिफ यांनी संजय राऊतांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी ठामपणे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही. पक्षातील ऐक्य टिकवण्याबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे हसन मुश्रिफ यांनी गुरुवारी 2 एप्रिल 2026 रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली.
हेही वाचा- Sunetra Pawar Meet Praful Patel-Sunil Tatkare: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांनी घेतली पटेल-तटकरेंची नवी दिल्लीत भेट
यावेळी हसन मुश्रिफ म्हणाले की, “राज्यसभा खासदार म्हणून सुनेत्रा पवार शेवटची सही करण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेल्या असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितल होत. आमचा राष्ट्रवादी पक्ष एकत्र आहे आमच्यात काही मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून मिटवू. पक्षाच्या घटना बदलण्याबाबत सुनेत्रा पवार यांनी जे स्पष्टीकरण मागवलं होत त्यावर तटकरेंनी जे स्पष्टीकरण दिल त्यावर त्या स्वतः योग्य पद्धतीने त्यांच मत मांडतील. संजय राऊत यांनी आपल्या पक्षातील माणस संभाळावी, राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील एकही आमदार आपला पक्ष सोडून कुठेही जाणार नाही.”
तसेच दोन दिवसापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कणेरी मठ येथे केलेल्या विधानावर देखील हसन मुश्रिफ यांनी खोचक विधान केलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “भारतामध्ये पूर्वी सुबत्तता होती. देशात वैभव होते. देशात सोन्याचा धूर निघायचा. मात्र इंग्रजांनी व मुस्लिम राजवटीने तो लुटून नेला.” असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानावर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले ” मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मी काही जास्त बोलणार नाही कारण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे.” असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.