नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता टीसीएस कंपनीतील महिलांवरील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे नाशिकमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला असून, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे.
मोर्चा टीसीएस कंपनी परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात येत आहे. भगवे झेंडे, “जय श्रीराम”च्या घोषणा आणि दुचाकींवरील महिलांची उपस्थिती यामुळे नाशिक शहरात मोठे आंदोलनात्मक वातावरण तयार झाले आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या, विविध हिंदू संघटनांच्या महिला पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
या मोर्चात आमदार देवयानी फरांदे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांवर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये संताप अधिक वाढला आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली आहे.
एकूणच, हा मोर्चा केवळ सामाजिक मुद्द्यावर मर्यादित न राहता आता राजकीय स्वरूप धारण करत असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.