Nashik Election 2026: राज ठाकरेंनी मारला ‘लाकूडतोड्या’चा टोला, महाजनांनी दाखवला ‘ग्रीन नाशिक’चा आरसा; नाशिकचं राजकारण तापलं

केवळ झाडांच्या वादावर न थांबता महाजन यांनी ठाकरे ब्रँडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Nashik Election 2026: राज ठाकरेंनी मारला ‘लाकूडतोड्या’चा टोला, महाजनांनी दाखवला ‘ग्रीन नाशिक’चा आरसा; नाशिकचं राजकारण तापलं

नाशिक: 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत, मात्र नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर 'लाकूडतोड्या' अशी खोचक टीका केल्यानंतर, महाजन यांनीही आता शड्डू ठोकला आहे. "मी लाकूडतोड्या असेल तर असू द्या, पण मी 20 हजार झाडे लावून त्यांचे संगोपनही करतोय," अशा शब्दांत महाजन यांनी राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे.

राज ठाकरेंची 'ती' तोफ आणि 'लाकूडतोड्या'चा टोला

नाशिकमधील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी जुन्या लोककथेचा संदर्भ देत गिरीश महाजनांवर निशाणा साधला होता. "त्या कथेतील लाकूडतोड्या सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नव्हता, पण हे आधुनिक लाकूडतोडे झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील माणसं छाटतात," असा घणाघाती आरोप त्यांनी केला. तपोवनातील 1800 हून अधिक झाडांच्या कत्तलीचा घाट घातला जात आहे अशी टीका राज यांनी केली होती. या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती.

हेही वाचा: Pune Election 2026: आता पुण्यात जमिनीखाली धावणार गाड्या! मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला 32 हजार कोटींचा प्लॅन

महाजनांचा पलटवार: "पर्यावरणप्रेमींच्या नावाखाली अडथळे"

राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी गिरीश महाजन यांनी गोदाघाटावरील भाजपची सभा निवडली. त्यांनी स्पष्ट केले की, तपोवनातील जुनी आणि मोठी झाडे तोडली जाणार नाहीत. "गेल्या 10 वर्षांत आपोआप उगवलेली छोटी झुडपे साधुग्रामच्या नियोजनासाठी काढणे आवश्यक आहे. मात्र, काही डाव्या विचारसरणीचे लोक आणि राजकीय नेते जाणीवपूर्वक कुंभमेळ्याच्या कामात खोडा घालत आहेत," असा आरोप महाजन यांनी केला.

आंध्रातून आठ हजार झाडे दाखल, तरीही विरोध?

महाजन यांनी आपल्या 'ग्रीन प्लॅन'चा पुरावा देताना सांगितले की, त्यांनी स्वतः आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून 15 फूट उंचीची सुमारे आठ हजार झाडे नाशिकमध्ये आणली आहेत. "आम्ही 'एक झाड तोडल्यास 10 लावू' या तत्त्वावर काम करत आहोत. आतापर्यंत हजारो झाडे लावली, पण एकाही तथाकथित वृक्षप्रेमीने त्याचे कौतुक केले नाही. केवळ टीआरपीसाठी माझ्यावर टीका केली जात आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

ठाकरे ब्रँड आणि महापालिकेचा सत्तासंघर्ष

केवळ झाडांच्या वादावर न थांबता महाजन यांनी ठाकरे ब्रँडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई महापालिकेतील 25 वर्षांचा सत्ताकाळ आणि कोरोना काळातील घोटाळ्यांचा उल्लेख करत त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. "लोकांचा विश्वास आता केवळ महायुतीवर आहे. मग ते ठाकरे असोत वा पवार, आगामी निवडणुकीत कुणीही भाजपला रोखू शकणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तपोवनातील झाडांच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. एका बाजूला पर्यावरणाचे रक्षण आणि दुसरीकडे कुंभमेळ्याची भव्य तयारी, अशा कात्रीत नाशिकचे प्रशासन अडकले आहे. राज ठाकरेंचा हा 'लाकूडतोड्या' शब्द आगामी निवडणुकीत किती प्रभावी ठरतो आणि महाजन आपला 'ग्रीन नाशिक'चा दावा कसा सिद्ध करतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हेही वाचा: Maharashtra Municipal Election: बाळासाहेबांचे स्वप्न माझ्यामुळे पूर्ण होत असेल तर…; गिरीजा ओकच्या त्या प्रश्नावर फडणवीस स्पष्टचं बोलले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number