नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत लोकशाहीपेक्षा पैशांचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून आला. निवडणुकीला ‘लोकशाहीचा सण’ म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मतदारांवर पैशांचा वापर होत असल्याचे जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषदांत प्रकर्षाने जाणवले. महायुतीतील पक्षांमध्ये चाललेल्या वर्चस्वाच्या चढाओढीमुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रकमेचे प्रलोभन दाखवले गेले. मतांची खरेदीही अनेक ठिकाणी उघडपणे झाल्याची चर्चा होती.
अनेक ठिकाणी मतदारांना गुपचूप पैसे वाटले गेले. काही प्रभागांमध्ये एका मताची ‘किंमत’ दोन हजारांपासून थेट दहा हजारांपर्यंत गेल्याचे सांगितले जात होते. त्र्यंबकेश्वरमध्ये तर एका प्रभागात उमेदवारांनी एकत्रितपणे प्रतिमतदार तब्बल 35 हजार रुपये देत असल्याच्या चर्चा जोरात होत्या. मात्र, यंत्रणेकडून नेहमीप्रमाणेच “सर्व प्रक्रिया सुरळीत” असा दावा करण्यात आला. यंदाच्या निवडणुका मंत्र्यांनी स्वतः प्रतिष्ठेच्या केल्यामुळे सिन्नर, भगूर, त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव, मनमाड आणि येवला आदी नगरपरिषदांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा फिरला. प्रचार संपताच उमेदवारांची ‘विशेष यंत्रणा’ कामाला लागली. काही ठिकाणी रोख वाटणाऱ्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या ‘खाटा बाहेर ठेवा… लक्ष्मीदर्शन होईल’ या वक्तव्याचा जिल्ह्यात अक्षरश: अनुभव आला. मतदानाच्या आदल्या रात्री अनेक घरांपुढे पैसे देण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. त्यामुळे निवडणूक प्रामाणिक पद्धतीने होत असल्याचा दावा करणाऱ्या यंत्रणेबद्दल मतदारांमध्ये नाराजी पसरली. मतदानादरम्यान दुपारनंतर ‘उर्वरित’ मतदारांशी संपर्क साधण्यासाठी उमेदवारांकडून आक्रमक हालचाली सुरू झाल्या. ग्रामीण भागात सायंकाळी मतदार संख्या अचानक वाढल्याने निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले का, अशा चर्चा सुरू होत्या.
सत्ताधारी पक्षांतीलच स्पर्धेमुळे परिस्थिती अधिक चिघळत होती. येवल्यात पैशांच्या वाटपावरून गोंधळ उडाला. शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून होत असलेल्या रक्कमवाटपाचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समोर आणले. सिन्नरमध्ये एका उमेदवारावर विषारी औषधाच्या स्प्रेने हल्ल्याचा प्रयत्न झाला, तर त्र्यंबकेश्वरमध्ये उमेदवारांच्या समर्थकांमध्ये पैशांवरून वाद चिघळून हाणामारीपर्यंत पोहोचला.
निवडणुकीच्या नावाखाली पैशांच्या उधळपट्टीने संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असून, प्रामाणिक लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. येत्या काही दिवसांत या घटना कोणते चित्र तयार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.