नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्र-तंत्र, अंकशास्त्र आणि तथाकथित अध्यात्माच्या आडून महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वादळाचे रूप घेतले आहे. या प्रकरणाची छाया थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचल्याने अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लिहले आहे, “चाकणकरांचा आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही. चाकणकरांना जर स्वेच्छेने ने राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी एक वर्षापूर्वी जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आलं तेव्हाच किंबहुना किमान तीन दिवस आधी तरी तो राजीनामा दिला असता चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपडत राहिल्या.”
पुढे टीका करताना सुषमा अंधारे यांनी लिहले आहे, “चाकणकरांना जरा जरी पश्चातापबुद्धी झाली असती तर त्या खरात ची अटक झाल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या मुळात हा राजीनामा नाही ही हकालपट्टी आहे. चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये. नुसता राजीनामा पुरेसा नाही. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करून आणि त्यांची अटक होणं जास्त गरजेचे आहे…” अशा शब्दात अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केले आहे,”मोठेमोठे गार केले गंमतमधी’. अशा शब्दात चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांच्या या दोन्ही पोस्टची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर त्याने स्वतःला ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि ‘अंकशास्त्रज्ञ’ म्हणून सादर केले होते. गेल्या काही वर्षांत तो अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना मार्गदर्शन करतो, अशी प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र आता त्याच्यावर लागलेल्या गंभीर आरोपांमुळे त्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले आहेत. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्यांच्या विधानांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून सोशल मीडियावरही या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पदाचा राजीनामा दिल्यानंतरही वाद शांत झालेला नाही. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे रुपाली चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत पुन्हा एकदा राजकीय टोला लगावला. त्यामुळे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी पोहोचले आहे.
अंधश्रद्धा, अध्यात्म आणि प्रभावशाली व्यक्तींच्या नावाखाली समाजात उभे राहणारे भोंदूपण किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा आठवण या प्रकरणाने करून दिली आहे. पोलिस तपासातून पुढे आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.