मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे पडसाद आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत गोटात उमटू लागले आहेत. यामुळे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर थेट परिणाम जाणवत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर आमदार नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट शब्दांत त्यांची भूमिका प्रथमच मांडली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना झिरवळ म्हणाले की, “माझे कोणाबरोबरही वैयक्तिक दुश्मनी किंवा वैमनस्य नाही. सर्व पक्षांतील नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहेत. माझी कोणाशीही स्पर्धा नाही.” त्यामुळे स्वतःविरुद्ध सुरू असलेल्या कथित राजकीय हालचालींना त्यांनी दुजोरा दिला नाही.
पक्षांतर्गत राजकारणातून तुमचे पद काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तुमच्याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर झिरवळ म्हणाले की, “हा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रात येतो. पुढे काय करायचे, हे तेच ठरवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे कामकाज पाहिले आहे. माझ्या कामावर किंचितही आक्षेप घेण्यासारखे कारण नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही कारवाई होणार नाही.”
तसेच, पक्षातून त्यांच्या विरोधात राजकारण सुरु असल्याचा दावा त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. “राजकारणात काम करत असताना सर्व पक्षांबरोबर माझे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे मुद्दाम मला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही,” असेही झिरवळ यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांची अद्याप भेट झालेली नसल्याची माहिती देत झिरवळ म्हणाले की, “मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.” आता नरहरी झिरवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या संदर्भात पुढे कोणता निर्णय होतो आणि राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे