पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बैरकपूर येथे ‘विजय संकल्प रॅली’ला संबोधित करत जोरदार राजकीय संदेश दिला. या सभेत त्यांनी सांगितले की, “ही माझी या निवडणुकीतील शेवटची सभा आहे. आता 4 मे नंतर मी शपथविधीसाठी पुन्हा येथे येईन,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला.
सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. “कोलकात्याला लंडनसारखे बनवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण गेल्या 15 वर्षांत शहराची ओळखच बदलून टाकली गेली,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांना आवाहन केले की, “आपण सर्वांनी मिळून कोलकात्याची मूळ ओळख जपली पाहिजे.”
पंतप्रधानांनी बंगालशी असलेल्या त्यांच्या भावनिक आणि आध्यात्मिक नात्याचाही उल्लेख केला. “बंगालबद्दल माझा जिव्हाळा हा शक्तीच्या भक्तीतून निर्माण झाला आहे. माझ्या वैयक्तिक आध्यात्मिक प्रवासात बंगाल ही ऊर्जा देणारी भूमी राहिली आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी येथे मिळालेल्या अनुभवांना आशीर्वाद मानत बंगालच्या जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Speaking at a huge rally in Barrackpore. People across West Bengal want security, opportunities and honest governance, which TMC has completely failed to deliver.@BJP4Bengal
https://t.co/yvD05mmyu0 — Narendra Modi (@narendramodi) April 27, 2026
निवडणूक प्रचारातील शेवटच्या सभेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील जनतेचा कल भाजपकडे असल्याचा दावा केला. “मी जिथे जिथे गेलो, तिथे लोकांचा उत्साह पाहिला आहे. त्यामुळे 4 मे रोजीच्या निकालांनंतर पुन्हा येथे येऊन शपथविधीला उपस्थित राहावे लागेल, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी जनतेसोबतच्या भावनिक नात्याबाबतही मनोगत व्यक्त केले. “रॅली आणि रोडशोदरम्यान मला अनेक संदेश, पत्रे आणि चित्रे मिळतात. ती मी रात्री वेळ काढून पाहतो. काहींमध्ये तुमचे दुःख दिसते, तर काहींमध्ये आशीर्वाद जाणवतो,” असे सांगत त्यांनी लोकांच्या भावना आपल्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदी यांच्या या सभेमुळे पश्चिम बंगालमधील निवडणूक वातावरण अधिक तापले असून, आगामी निकालांबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना वेग आला असून, निकालानंतर राज्याच्या राजकारणात कोणते चित्र उभे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.