मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार नरहरी झिरवाळ एका वादग्रस्त व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आले असून या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
महाविकास आघाडीने झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर निशाणा साधला आहे. “या सरकारचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांनीच याबाबत निर्णय घेतला पाहिजे,” अशी मागणी करण्यात येत आहे.
अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे सांगितले जात आहे. “नरहरी झिरवाळ यांच्यासारखा ज्येष्ठ नेता अशा प्रकरणात कसा अडकतो, हा प्रश्न आहे. झिरवाळ हे तसं चांगले व्यक्तिमत्त्व आहे, मात्र या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे,” असे दानवे यांनी म्हटले.
हेही वाचा: Donald Trump: 165 वर्षानंतर मोठा बदल! अमेरिकन डॉलरवर आता डोनाल्ड ट्रम्प यांची सही?
रोहित पवार यांचे मत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की, “व्हिडिओमध्ये दिसणारे लोक प्रौढ असतील, तर कायदेशीर बाबींचा विचार करूनच कारवाई व्हावी. जर संबंधित व्यक्तीकडून तक्रारच नसेल, तर या प्रकरणावर राजकीय भूमिका घेणे योग्य नाही.”
उदयकुमार आहेर यांचा बचाव
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी झिरवाळ यांचा बचाव करत वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले की, “व्हिडिओ पाहता झिरवाळ हे त्या ठिकाणी हतबल अवस्थेत दिसत आहेत. ते कॉटवर पडलेले असून परिस्थितीतून बाहेर पडण्याचा विचार करताना दिसतात. त्यांना दोषी ठरवणे योग्य नाही.”
आहेर यांनी पुढे असा आरोपही केला की, “ही जुनी व्हिडिओ क्लिप मुद्दाम व्हायरल करण्यात आली असून झिरवाळ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीही ही चित्रफीत पुढे आणली गेली असावी.”
प्रकरणाला राजकीय रंग
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. झिरवाळ यांच्या संदर्भातील चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते आणि सरकार किंवा पक्ष यावर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.