नागपूर: गुरुवारी 4 मे रोजी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-2’चा समारोप सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं असून त्यांच्या भाषणाकडे देशभरातील स्वयंसेवकांचे लक्ष लागले होते. यावेळी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘पंचपरिवर्तन’ उपक्रमाचा उल्लेख सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषणात केला आहे.
जागतिक युद्धजन्य परिस्थिती, महागाई, युवकांशी संबंधित प्रश्न आणि सामाजिक विषयांवरही मोहन भागवतांनी भाष्य केले. तसेच 11 मे पासून सुरू असलेल्या या 25 दिवसीय प्रशिक्षण वर्गात देशभरातील 880 स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती दिली. यावेळी स्वयंसेवकांमध्ये नेतृत्व, शिस्त आणि संघटन कौशल्य विकसित करणे हा वर्गाचा मुख्य उद्देश असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान “ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांनाच जग ऐकतो. शक्तिशाली आणि वैभवसंपन्न देशाचे कुणीच काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे जगाला सांभाळण्यासाठी आपला देश शक्तिशाली झाला पाहिजे. त्यासाठी देशासाठी जगणारे आणि मरणारे स्वयंसेवक हवे आहेत”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
तसेच “ज्यांचा संबंध नाही असेही देश अमेरिका -इराण युद्धात पिसत चाललेले आहेत. संकट आहेत त्याकडे माणसाचं ध्यान जात नाही. आपण विकास आणि स्वार्थामध्ये फसलो आहोत. भारत कधीकाळी विश्वगुरू होता, हजारो वर्षे आम्ही गुलामगिरी केली, ज्यांनी आमच्यावर राज्य केले ते आमच्यापेक्षा चांगले कधीच नव्हते. हिंदुत्वाच्या जागरणाचा प्रयत्न स्वामी विवेकानंद दयानंद महर्षी यांच्यापासून सुरू आहे. आज आमच्या कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास जगभरात करण्यात येत आहे. आता भारताची वेळ आलेली आहे, मात्र केवळ वेळ देऊन चालणार नाही त्या वेळेसाठी तयार व्हावं लागतं. भारत विश्वगुरू आहे, मात्र आमची तयारी कुठे आहे?” असा सवाल यावेळी मोहन भागवत यांनी यावेळी केला आहे.