लोकसभा निवडणुकीसाठी मविआ एकत्र निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, मविआचे लोकसभेच्या जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे. उद्धव गटाला 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 तर काँग्रेसला 8 जागा देण्यात आल्या आहेत. मविआच्या बैठकीत हा निर्णय झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी उद्धव गटाला 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 तर काँग्रेसला 8 जागा देण्यात आल्या. मुंबईत लोकसभेच्या 6 जागा आहेत. त्यापैकी 4 जागा ठाकरे गट लढवणार आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात ठाकरे गट निवडणूक लढवणार आहेत. तर, ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी आणि उत्तर मुंबईतून काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.
तसेच, आपापल्या मित्रपक्षांना स्वत:च्या कोट्यातून जागा द्याव्यात असेही महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडी घटक पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मविआचे लोकसभेच्या जागा वाटपाचे सूत्र ठरवण्यात आले. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.