सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधुन अटक केलीय. संतोष जाधव सोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला ही पोलिसांनी अटक केलीय. या दोघांना रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आलं असता त्यांना 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.
संतोष जाधव हा गुजरातला त्याचा साथीदार नवनाथ सुर्यवंशी याच्याकडे जाऊन लपला होता. पुणे ग्रामीण पोलीसांची टीम गुजरातमधील भुज जिल्ह्यातील मांडवी गावात पोहचली. तिथे त्यांना नवनाथ सूर्यवंशी सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आधी माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलीसांनी त्यांचं कौशल्य वापरल्यावर त्याने संतोष जाधवला मांडवी गावाजवळील नागोर गावात लपवलं असल्याच सांगितल. संतोष जाधवला वेगळी खोली घेऊन देण्यात आली होती.
तिथे त्याच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. ओळख लपविण्यासाठी संतोष जाधवने डोक्याचे टक्कल केले होते. त्याचबरोबर त्याने त्याचा पेहराव देखील बदलला होता. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांनी त्याला तो राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकून पकडले. संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे हे लॉरेन्स बिष्णोई टोळीत सहभागी झाले होते. मात्र सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधवचा काय रोल होता हे याचा तपास केला जाणार आहे. गुजरात बरोबरच दिल्ली आणि दिल्लीतही पुणे ग्रामीण पोलीसांच्या टीम्स संतोष जाधवचा शोध घेत होत्या.