केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार येथे होत असलेल्या पंचायत निवडणुकीने अचानक देशभराचे लक्ष वेधून घेतले आहे. साधी ग्रामपंचायत निवडणूक असली तरी एका उमेदवाराच्या नावामुळे ही स्पर्धा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपाने येथे ज्या महिला उमेदवाराला तिकीट दिले आहे, त्यांचे नाव सोनिया गांधी असल्याने ही निवडणूक विशेष ठळक बनली आहे.
या नावसाधर्म्याची चर्चा इतक्यावरच थांबत नाही. भाजपाच्या उमेदवार सोनिया गांधी या मूळतः काँग्रेसच्या प्रभावशाली कुटुंबातील आहेत. त्यांच्या वडिलांची ओळख काँग्रेसचे निष्ठावंत आणि सक्रिय नेते म्हणून होती. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविषयी असलेल्या आदरामुळेच त्यांनी आपल्या मुलीला हेच नाव दिले होते. पुढे विवाहानंतर कुटुंबातील राजकीय दिशा बदलली आणि आता त्या स्वतः भाजपाच्या उमेदवारीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
भाजपाच्या उमेदवार सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासात आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे पती सुभाष. ते भाजपाचे स्थानिक स्तरावरील प्रभावी नेते असून पंचायत महासचिव आहेत. त्यामुळे पक्षातील वातावरण आणि कार्यपद्धतीची ओळख त्यांच्या कुटुंबाला अगदी जवळून आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सोनिया गांधी यांनीही पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत स्पर्धाही चुरशीची आहे. काँग्रेसच्या मंजुळा रमेश आणि सीपीएमच्या वलारमती या दोघी उमेदवारही जोरदार प्रचार करत आहेत. स्थानिक मुद्दे, विकास कामे आणि पक्षनिष्ठा या तिन्ही बाबींवर मतदारांकडून गंभीरपणे चर्चा सुरू आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, हे अंदाज लावणे सध्या कठीण झाले आहे.
मुन्नार पंचायत निवडणुकीत 9 आणि 11 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 13 डिसेंबरला मतमोजणी होईल. पण निकालापूर्वीच या निवडणुकीने मोठ्या माध्यमांचे लक्ष खेचले आहे. एका नावामुळे निर्माण झालेली राजकीय उत्सुकता आणि भाजपाच्या उमेदवाराचे नाव ‘सोनिया गांधी’ असल्याची आगळीवेगळी परिस्थिती आता देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे 13 डिसेंबरनंतर स्पष्ट होणार असले तरी सध्या तरी मुन्नारची निवडणूक ही राज्यापलीकडे जाऊन राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचली आहे. एका नावामागे उभा राहिलेला मोठा राजकीय संदर्भ यामुळे ही निवडणूक सर्वांच्या नजरेत भरून राहिली आहे.