मुंबई: महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने मोठी बाजी मारली आहे. येथे भाजपच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवत शिवसेना (शिंदे गट) आमदार मंजुळा गावित यांना मोठा धक्का दिला आहे.
पिंपळनेरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी आठ जागा जिंकल्या असून, दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. दुसरीकडे, उरणमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुसंडी मारली असून, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीअखेर भावना घाणेकर 1068 मतांनी आघाडीवर आहेत.
कोकण किनारपट्टीवरही चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत भाजपने सहा जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे, तर शिंदे गटाला दोन, ठाकरे गटाला एक आणि काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पा सुर्वे यांनी 7000 मतांची मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
पालघरमधील डहाणू नगरपरिषदेत मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटात टक्कर पाहायला मिळत असून, येथे शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आघाडीवर आहेत, तर भाजपचे भरत राजपूत पिछाडीवर पडले आहेत.
सांगली जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या कलानुसार इस्लामपूर, आष्टा आणि तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
विटा आणि शिराळा येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असून, जत आणि आटपाडीमध्ये भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे, तर पलूसमध्ये काँग्रेसने आपली आघाडी टिकवून धरली आहे. राज्यातील या निकालांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील चुरस अधिकच वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.