Sahar Shaikh: बेपत्ता युनूस शेख पोलिसांसमोर हजर, नोंदवला जबाब; MIM नगरसेविका सहर शेख अद्याप बेपत्ताच

मात्र, हा प्रतिष्ठेचा विजय आता सहर शेख यांच्यासाठीच मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

Sahar Shaikh: बेपत्ता युनूस शेख पोलिसांसमोर हजर, नोंदवला जबाब; MIM नगरसेविका सहर शेख अद्याप बेपत्ताच

मुंबई: राजकारणात वेळ कधी बदलेल आणि कोणावर कोणती वेळ येईल, हे सांगता येत नाही. कालपर्यंत ‘कैसे हराया?’ अशी गर्जना करत राजकीय विरोधकांना उघड आव्हान देणाऱ्या मुंब्र्यातील एमआयएम (MIM) नगरसेविका सहर शेख आता स्वतःच एका मोठ्या राजकीय आणि कायदेशीर चक्रव्यूहात अडकल्या आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत बनावट जातीचा दाखला सादर केल्याच्या गंभीर आरोपामुळे त्यांच्या नगरसेवक पदावरच आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. या प्रकरणामुळे मुंब्र्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्तासंघर्षाचा नवा अंक सुरू झाला आहे.

सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांची राजकीय पार्श्वभूमी मुळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी जोडलेली होती. एकेकाळी आव्हाडांचे कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या या कुटुंबाने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरीचे हत्यार उपसले. मुंब्र्यातून उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून सहर शेख यांनी थेट एमआयएमचा (MIM) झेंडा हाती घेतला. निवडणुकीच्या आखाड्यात उतरून त्यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर विजयानंतर ‘कैसे हराया?’ असा खोचक सवाल करत थेट जितेंद्र आव्हाडांना डिवचले होते. तेव्हापासूनच या दोन गटांमधील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचले होते.

मात्र, हा प्रतिष्ठेचा विजय आता सहर शेख यांच्यासाठीच मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झालेल्या सहर यांच्यावर निवडणुकीत खोटे आणि बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी चुकीच्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा हा आरोप अत्यंत गंभीर मानला जातो. जर चौकशीत हे आरोप सिद्ध झाले, तर त्यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द होऊ शकते. या कायदेशीर पेचामुळे सध्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Navneet Rana: ‘देशातील महिला विरोधकांना कधीच माफ करणार नाहीत’; महिला आरक्षणावरून खासदार नवनीत राणांचा संताप

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. याच तपासाचा एक भाग म्हणून सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांना शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. सुमारे 15 ते 20 मिनिटे पोलिसांसमोर त्यांनी सविस्तर जबाब नोंदवल्यानंतर ते पोलीस ठाण्याबाहेर आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव असला तरी, त्यांनी माध्यमांसमोर अत्यंत बचावात्मक आणि आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.

“आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि तथ्यहीन आहेत. हा निव्वळ एक राजकीय षड्यंत्राचा आणि सूडबुद्धीचा भाग आहे,” असा दावा युनूस शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तसेच, येत्या दोन दिवसांत आपण भूमिका अधिक स्पष्ट करू आणि या सर्व खोट्या आरोपांना पुराव्यानिशी सडेतोड उत्तर देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेले हे प्रकरण त्यांना बदनाम करण्यासाठीच रचले गेले आहे, असे संकेतही त्यांनी दिले.

आता मुंब्र्यातील या राजकीय नाट्याचा पुढचा अंक काय असणार, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहर शेख यांचे पद शाबूत राहणार की बनावट प्रमाणपत्राच्या कचाट्यात सापडून त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार, याचा फैसला येणारा काळच करेल. परंतु, एका गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे की, मुंब्र्याच्या राजकीय आखाड्यात वर्चस्वाची ही लढाई इथवरच थांबणार नाही, तर आगामी काळात ती अधिकच संघर्षमय होणार आहे. 

हेही वाचा: Iran US War: निर्बंध न उठवल्यास होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणार नाही; ट्रम्प यांचे ‘ते’ सात दावे खोटे ठरवत इराणने अमेरिकेला सुनावलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number