मुंबई : मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून आरक्षण देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अंकुश कदम यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ही घोषणा केली.
कायद्यानुसार राज्यात कमाल आरक्षण मर्यादा ५० टक्के एवढीच आहे. या मर्यादेत राहून आरक्षण देण्याची तरतूद आहे. सगळेच पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मकता दर्शवतात. मात्र आरक्षण मर्यादेत राहून आरक्षण देण्याबाबत कोणताही नेता व राजकीय पक्ष स्पष्ट भूमिका घेत नाही. कमाल मर्यादेत राहून आरक्षण देण्याचा विषय निघताच सर्व राजकीय पक्ष मौन बाळगात किंवा विषयांतर करतात. या संदर्भात बोलताना मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून आरक्षण देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
छत्रपती म्हणून अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. या सर्वांसह मराठा समजालाही हक्काचा न्याय मिळवून देईन, अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घेतलेल्या सभेत छत्रपतींनी आरक्षणाबाबतची घोषणा केली.