मुंबई: राज्यात एकीकडे मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच, आता मुंबईच्या राजकीय केंद्रस्थानी म्हणजेच 'शिवसेना भवन' परिसरात लावण्यात आलेल्या एका पोस्टरमुळे नवा वाद पेटला आहे. उत्तर भारतीय सेनेतर्फे लावण्यात आलेल्या या पोस्टरवर ‘उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे, वरना बटोगे तो पिटोगे’ असा खळबळजनक मजकूर छापण्यात आला आहे. या चिथावणीखोर पोस्टरमुळे दादर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याला अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
मनसेचा 'खळ्ळ-खट्याक'चा इशारा
उत्तर भारतीय सेनेच्या या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी कडाडून टीका केली. "मराठीचा अपमान कराल, तर नाही बटलात तरी ठोकले जाल," अशा शब्दांत देशपांडे यांनी इशारा दिला आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक मुंबईतील शांतता भंग करण्यासाठी आणि मराठी अस्मितेला डिवचण्यासाठी केला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. "मराठी माणसाच्या नादाला लागलात तर गाठ मनसेशी आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
नेमका वाद काय?
उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी हे वादग्रस्त पोस्टर लावले असून त्यांनी थेट मुंबईच्या महापौरपदावरही दावा ठोकला आहे. "उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत जर मराठी असू शकतात, तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाही?" असा सवाल शुक्ला यांनी उपस्थित केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उत्तर भारतीयांना लक्ष्य केले जात असल्याची भीती व्यक्त करत, मनसे सत्तेत आल्यास उत्तर भारतीयांविरुद्ध मोठे 'अभियान' सुरू होईल, असा दावाही त्यांनी केला.
राजकीय समीकरणे तापणार?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा 'मराठी विरुद्ध परप्रांतीय' हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. शिवसेना भवन, जे मराठी अस्मितेचे प्रतीक मानले जाते, त्याच परिसरात अशा प्रकारचे पोस्टर लावल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप आहे. या पोस्टरबाजीमुळे मुंबईतील वातावरण संवेदनशील झाले असून, पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. आता या वादाचे पडसाद आगामी काळात महापालिका निवडणुकीवर कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.