मुंबई मेट्रोसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेट्रोचा प्रवास आता महागणार आहे. त्यामुळे आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. ही भाडेवाढ नेमकी कोणत्या मार्गावर होणार आहे त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या काळात अधिक भाडे भरावे लागण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने अंधेरी (प) ते दहिसर मेट्रो 2 अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात ही भाडेवाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाडे निर्धारण समिती गठित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे ऑगस्टमध्ये पाठविला होता. राज्य सरकारने गेल्या महिन्यात त्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने समिती गठित करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव गेल्या महिन्यातच केंद्र सरकारच्या 'सॉल्ट पॅन' विभागाकडे पाठविला. भाड्याबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे त्याची शिफारस करेल. त्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतरच भाडेवाढ लागू होईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर सर्वाधिक भाडे आकारले जात आहे. मेट्रो 3 वर 8-12 किमी अंतरासाठी 40 रुपये भाडे आकारले जाते.एमएमआरडीएच्या मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिकेवर प्रती 3-12 किमीसाठी 20 रुपये भाडे आकारले जाते. मेट्रो 1 वर 8 ते 11.4 किमी अंतरासाठी 40 रुपये आकारले जाते