मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता ही सोडत पार पडणार असून, नेहमीप्रमाणे यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक काचेच्या डब्यातून चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत. या सोडतीद्वारे कोणते प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी आरक्षित होतील, तसेच कोणते प्रभाग खुले राहतील, हे निश्चित होणार आहे. यामुळे संपूर्ण मुंबईच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि ताण वाढला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने याबाबत अधिसूचना जारी केली असून, यावेळी मागील आरक्षण विचारात न घेता नव्या पद्धतीने प्रभागांची सोडत होणार आहे. या प्रक्रियेद्वारे अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), मागासवर्गीय प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला अशा विविध श्रेणींसाठी जागा निश्चित केल्या जातील. मुंबई महापालिकेत एकूण 227 प्रभाग आहेत. त्यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतात. याशिवाय अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2 आणि इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा राखीव असतात. या राखीव जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी असतात. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यावर 14 ते 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येतील. त्यानंतर सर्व हरकतींचा विचार करून आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया दृकश्राव्य माध्यमांद्वारे थेट दाखवली जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रम सुमारे 4 ते 5 तास चालेल. दरम्यान, या आरक्षणामुळे अनेक संभाव्य उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेकांनी अपेक्षित प्रभाग लक्षात घेऊन पक्षबदल केले असताना, सोडतीनंतर प्रभाग आरक्षित झाल्यास पुरुष उमेदवारांना दुसरा पर्याय शोधावा लागू शकतो. त्यामुळे अनेक राजकीय गटांत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकीय समीकरणांमध्ये हलचल
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे, आजच्या आरक्षण सोडतीच्या निकालावर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची संभाव्य युती होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सोडतीचा निकाल लागल्यानंतरच मुंबईच्या सर्वात मोठ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा आराखडा स्पष्ट होणार आहे.