गोरेगावच्या नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलीस प्रशासन अधिक तत्पर झालं आहे. नेस्को प्रकरणानंतर पार्टी ड्रग्जमध्ये असलेल्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अशातच पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून साकीनाक्यातून जप्त केलेल्या दोनशे एक्स्टेंसी गोळ्यांचे टिटवाळा कनेक्शन उघड झाले आहे. ANC व कल्याण ग्रामीण पोलिसांनी टिटवाळ्यात मोठी संयुक्त कारवाई केली. या कारवाईतून टिटवाळ्यातील ‘ड्रग्ज क्वीन’चा पर्दाफाश झाला आहे.
टिटवाळाच्या हायप्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अश्विनी पॉल उर्फ ‘ड्रग्ज क्वीन’ या महिलेच्या घरी छापा टाकून 6 कोटींच्या 5 हजार एक्स्टेंसी गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच 35 वर्षीय अश्विनी पॉल हिच्यावर अटकेची कारवाई करून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. 35 वर्षीय अश्विनी पॉल उर्फ ‘ड्रग्ज क्वीन’ ही पद्मावती रॉयल इमारतीतील 705 नंबर रूममध्ये भाड्याने राहत होती. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणानंतर अश्विनी पॉल ही दोन महिन्यांपासून फरार होती.
पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला असता, पोलिसांनी सुमारे 2.3 किलो वजनाच्या 4056 एमडी (एक्स्टेसी) गोळ्या जप्त केल्या. या जप्त केलेल्या मालाची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तावण्यात येत आहे. तसेच आरोपी अश्विनी पॉल हिचा मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स कुठून आले? याचा तपास सुरू आहे.