सध्या राज्यभरात गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आता राज्याच्या आर्थिक राजधानीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी हत्या झाल्याचे समोर आले आहे. एकाच दिवशी तीन हत्यांनी मुंबई हादरली आहे. दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात पूर्व वैमन्यसातून तीन हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
बेदम मारहाण करून हत्या :
दादरमध्ये पूर्व वैमन्यसातून 7 जणांनी एकाची पत्नीसमोर बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंकुश आंबेकर असे या तरुणाचे नाव असून पूर्ववैमन्यसातून हत्या झाली आहे. अंकुशचा गौरव सनस याच्याशी वाद होता. याच वादातून रविवारी अंकुश हा आपल्या पत्नी सोबत मित्र भूपेंद्र सोलंकी याला भेटायला जात असताना
गौरव सनस, अनिल पटेल, राजेश पटेल, सिद्धेश पटेल, साहिल राणे, अविनाश खवरे, अजय यादव या आरोपींनी अंकुशची नको सयाजी वाडी येथे वाट अडवली. त्यानंतर आरोपींनी अंकूशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अंकुश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारा करता परळच्या के ई एम रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान अंकुशराव मृत्यू झाला. अंकूशची पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून 7 आरोपींना अटक केली आहे तर इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे.
गाडी पार्किॅगच्या वादात गमावला जीव:
त्यानंतर माटुंगा येथेदेखील धक्कादायक घटना घडली आहे. माटुंगा येथे गाडी पार्किॅगचा वाद विकोपाला केल्याने दोघांनी नरेश वाघेला या ज्येष्ठ नागरिकांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दादर टाटा येथील ब्रिजखाली वाहन उभी करू नये यासाठी वाघेला हे आरोपीला सांगण्यास गेले असता, आरोपी साहिल घाडगे आणि शाहबाज मो रफिक शेख या दोघांशी वाघेला यांचा शाब्दिक वाद झाला.
यावेळी वाघेला यांच्यासोबत त्यांची पत्नी सविता वाघेलादेखील होत्या. अचानकपणे दोन्ही आरोपींनी वाघेला यांना मारहाण करत आरोपींनी पळ काढला. या मारहाणीत वाघेला हे गंभीर झाले त्यांना उपचारांसाठी परळच्या के ई एम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी वाघेला यांना मृत घोषित केले. वाघेला यांची पत्नी सविता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पूर्व वैमन्यसातून एकावर धार धार शस्त्राने वार :
त्याचप्रमाणे वांद्रे येथील खेरवाडी येथे पूर्व वैमन्यसातून एकावर धार धार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या शाब्दिक वादातून खेरवाडीच्या कल्पतरू स्पार्कल्स येथे अभिनव चौधरी यांची हत्या दोन अज्ञात व्यक्तींनी केली आहे. या प्रकरणी अभिनवच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून खेरवाडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.