मुंबई : मुंबईत नऊ महिन्यात तीन राजकीय हत्या झाल्या. पहिली घटना ९ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली. फेसबुक लाईव्ह करत शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा उर्फ 'मॉरिस भाई' याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली नंतर आत्महत्या केली. राजकीय महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेली स्पर्धा या गुन्ह्यासाठी कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले होते. यानंतर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती. सचिन कुर्मा यांच्यावर भायखळामधील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या दोन घटनांनंतर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना पंधरा दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. यानंतर निर्मलनगर खेरवाडीत त्यांची हत्या करण्यात आली. छातीत गोळी लागून झालेल्या अतिरक्तस्रावाने बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अल्पावधीत ताब्यात घेतले. या दोघांपैकी एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील वादातून झाली आणि ही हत्या बिश्नोई टोळीने केली असा संशय व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकारी दया नायक यांच्या नेतृत्वात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुरू आहे.
मुंबईत नऊ महिन्यात तीन राजकीय हत्या
बाबा सिद्दीकी प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले. एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा. मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकारी दया नायक यांच्या नेतृत्वात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुरू.
………..
कशी झाली बाबा सिद्दीकींची हत्या ? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम