Sanjay Raut: “मुंबईचा महापौर पहिल्यांदाच दिल्लीहून ठरणार, हे महाराष्ट्राचं…” संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

सौदेबाजी, दबाव, फोन टॅपिंग आणि दिल्लीहून महापौर ठरवल्याचे आरोप करत त्यांनी हा मुंबई व महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

Sanjay Raut: “मुंबईचा महापौर पहिल्यांदाच दिल्लीहून ठरणार, हे महाराष्ट्राचं…”  संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू असताना, महापौरपदावरून सुरू असलेल्या चर्चांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपकडून “महापौर भाजपचाच होणार” असा दावा केला जात असताना, त्याचवेळी सुरू असलेली सौदेबाजी ही संशयास्पद असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले की, “जर मुंबई महानगरपालिकेचा महापौर महायुतीचाच असणार आहे, तर मग सध्या इतकी सौदेबाजी का सुरू आहे? शिंदे गटाला फार मनावर घेण्यासारखे काही नाही.” नगरसेवकांना लपवून ठेवणे, इतर पक्षांचे नगरसेवक फोडणे, दबाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे, ही परिस्थिती केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून इतर महानगरपालिकांमध्येही दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी मतदारांची प्रतारणा केल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, पैशांचे वाटप झाले असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर येत आहेत. “लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या अशा प्रकारांमुळेच महापालिकांमधील राजकारण बदनाम होत आहे,” असे ते म्हणाले.

हेही वाचा: Mahesh Sawant : ‘भाजपचे सर्व कार्यकर्ते चांगले, सरवणकरांनी टोळीचं नाव घ्यावं’; ठाकरेंच्या आमदारानं थेट विचारलं

महापौर पदाच्या अधिकारांवर भाष्य करताना राऊत यांनी सांगितले की, शिंदे गटाला प्रत्यक्षात महापौर पदाचे नव्हे, तर स्टँडिंग कमिटीचे आकर्षण आहे. “महापौर हे केवळ शोभेचे पद आहे, खरे अधिकार स्टँडिंग कमिटीकडे असतात. त्यामुळेच हे सगळे नाटक सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. परदेशांमध्ये महापौर हे पॉलिसी मेकर असतात, मात्र भारतात तसे अधिकार नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतील दोन नगरसेवक सध्या संपर्कात नसल्याचे सांगत राऊत म्हणाले की, “जर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही, तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल.” याचवेळी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी टोला लगावला की, “शिंदे सेनेवर विश्वास तरी काय ठेवायचा? ज्यांचा बापच मूळ पक्ष सोडून पक्षांतरातून तयार झाला आहे.”

भाजपवर गंभीर आरोप करत राऊत म्हणाले की, भाजपने प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवले आहेत. प्रत्येक भागात नेमलेले लोक नगरसेवकांवर लक्ष ठेवून आहेत. “भाजप आणि शिंदे गटातील नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे,” असा मोठा आरोप त्यांनी केला. रश्मी शुक्ला सध्या पदावर नसल्या, तरी फोन टॅपिंगची प्रक्रिया भाजपच्या काळात सुरूच असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. ताज लँडमध्ये ठेवण्यात आलेल्या नगरसेवकांचे फोनही टॅप होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा: KDMC Politics : कल्याण-डोंबिवलीत सत्तेचं नवं समीकरण; भाजपला मोठा धक्का, मनसेची शिंदेंच्या शिवसेनेला साथ

“मुंबईचा महापौर पहिल्यांदाच दिल्लीहून ठरवला जात आहे, हे इतिहासात पहिल्यांदाच घडते आहे,” असे सांगत राऊत यांनी भाजप नेते अमित शाह यांच्याकडे जाऊन शिंदे गटाला पायापाशी बसावे लागत असल्याचा आरोप केला. हा महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस हे जरी दावोस दौऱ्यावर असले, तरी तिथे गुंतवणुकीपेक्षा मुंबईच्या महापौर पदावरच अधिक चर्चा सुरू असल्याचा दावाही राऊत यांनी केला. “भाजपकडे सध्या आकडा आहे, ते चौकार मारतील; पण आम्ही षटकार मारू,” असे सूचक विधान करत त्यांनी राजकीय लढत अजून संपलेली नसल्याचे संकेत दिले. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंना भाजपवर ठेवायचे की नाही, यावर चिंतन-मंथन सुरू असल्याचाही दावा करत राऊत यांनी बनावट शाई प्रकरणावर भाष्य केले. “या बनावट शाईमुळेच काही जागा भाजप आणि शिंदे गटाला जिंकता आल्या,” असा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याबाबत संकेत देत सांगितले की, हा सोहळा शणमुखानंद हॉलमध्येच होणार असून मनसे आणि शिवसेना मिळून हा कार्यक्रम होणार आहे. “बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एखाद्या आयरागैऱ्याच्या हातात देणे हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे,” असा खोचक टोला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदावरून सुरू असलेल्या या आरोप प्रत्यारोपांमुळे आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

हेही वाचा: Asaduddin Owaisi: “माझ्या यशावर भाजप जळतेय!” असदुद्दीन ओवैसींचा भाजपवर थेट प्रहार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number