मुंबई: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले असून, सर्वाधिक चर्चा मुंबई महानगरपालिका निवडणुकीची सुरू आहे. देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी यावेळी मोठ्या राजकीय हालचाली घडत असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात प्राथमिक सहमती झाल्याचे संकेत मिळत आहेत.
आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्याचबरोबर जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युलाही ठरल्याचे वृत्त आहे. या आघाडीत डाव्या पक्षांनाही सामावून घेण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे विरोधकांसमोर मजबूत आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे गट) 120 ते 125 प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे. मनसेला 75 ते 80 प्रभाग, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला 20 ते 27 प्रभाग देण्याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याने ही युती प्रामुख्याने या तीन पक्षांपुरती मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. त्या वेळी जिंकलेले प्रभाग कायम ठेवत आणखी 36 ते 40 नव्या प्रभागांवर ठाकरे गटाने दावा केल्याचे वृत्त आहे. जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी किमान 120 ते 125 जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाकरे गट ठाम असल्याचे समजते. विविध प्रभाग कोणत्या पक्षाला द्यायचे, यावर ठाकरे गट आणि मनसेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये अंतिम चर्चा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर शरद पवार गटाचा मुंबईतील प्रभाव तुलनेने मर्यादित झाला असला तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून त्यांना 20 ते 27 प्रभाग मिळू शकतात. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते. त्या प्रभागांसह घाटकोपर, कांजूरमार्ग, कुर्ला, चुनाभट्टी, मालाड, अणुशक्ती नगर, भांडुप आणि भायखळा परिसरातील आणखी 10 ते 15 प्रभागांवर राष्ट्रवादीने मागणी केली असल्याचे समजत आहे.
मनसेला 75 ते 80 प्रभाग मिळण्याची शक्यता असून, मागील निवडणुकीत निवडून आलेल्या सात नगरसेवकांच्या प्रभागांसह काही प्रभावी प्रभागांवर मनसेचा दावा आहे. माहीम, शिवडी, वरळी, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघांतील काही प्रभागांवर मनसेची विशेष नजर आहे. त्यामुळे या भागांत जागा वाटप करताना तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यामुळे ठाकरे गटाला काही प्रभागांबाबत माघार घ्यावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ठाकरे-मनसे-राष्ट्रवादी आघाडीसोबत डाव्या पक्षांनाही सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष काही निवडक प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डाव्या पक्षांचा समावेश झाल्यास काही प्रभागांमध्ये मतविभाजन टाळता येईल, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, जागा वाटपावरून राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत, तर दुसरीकडे प्रभागनिहाय गणिते जुळवताना युतीतील पक्षांसमोर आव्हानेही उभी राहणार आहेत. मुंबईतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, याचे चित्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. मात्र, या निवडणुकीने मुंबईच्या राजकारणात मोठे वळण आणण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.