मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी आता राजकीय हालचालींनी कमालीचा वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच, रविवारी रात्री 'मातोश्री' निवासस्थानी शिवसैनिकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारांना अधिकृत 'एबी फॉर्म'चे वाटप करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, कारण प्रत्येक उमेदवाराला प्रत्यक्ष भेटून उद्धव ठाकरे त्यांच्या हाती निवडणूक लढवण्याचे अधिकृत पत्र सोपवत होते.
या राजकीय घडामोडींमध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघाची विशेष चर्चा रंगली. वर्सोव्याचे आमदार हारून खान यांच्या उपस्थितीत रात्री साडेबाराच्या सुमारास वर्सोवा परिसरातील सहा वॉर्डांच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यावेळी हारून खान यांनी एक मोठे राजकीय विधान करत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. "मुंबईचा पुढचा महापौर हा मराठीच असेल आणि तो ठाकरेंच्या शिवसेनेचाच असेल," असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या विधानामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात आता 'महापौर पदाचा चेहरा' कोण असणार, यावरून चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस मुंबईत मोठ्या शक्तीप्रदर्शनाचा ठरणार आहे. रविवारी रात्री ज्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले, ते सर्व आज आपापल्या विभागात मिरवणुका काढून आणि समर्थकांसह अर्ज दाखल करतील. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची अधिकृत उमेदवारांची यादी आज सकाळी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या यादीत जुन्या जाणत्या चेहऱ्यांसोबतच नव्या दमाच्या तरुणांना किती संधी मिळते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
जागावाटपाच्या मुद्द्यावरही ठाकरे गटाने आता सकारात्मक पाऊल टाकले आहे. मनसे आणि शिवसेनेतील (UBT) जागावाटपाचा तिढा आता सुटल्याचे संकेत माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांची ताकद नेमकी कशी विभागली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुंबईची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरेंनी यावेळेस कमालीची गोपनीयता पाळत थेट मातोश्रीवरून चक्रे हलवण्यास सुरुवात केली आहे.
वर्सोवा विभागातून ज्या सहा उमेदवारांना रात्रीच एबी फॉर्म मिळाले, त्यांची नावे आता समोर आली आहेत. यात प्रभाग क्र. 59 मधून शैलेश फणसे, 60 मधून मेघना विशाल काकडे माने, 61 मधून सेजल दयानंद सावंत, 62 मधून झीशान चंगेज मुलतानी, 63 मधून देवेंद्र (बाळा) आंबेरकर आणि प्रभाग 64 मधून सबा हारून खान यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी आता प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार
या उमेदवारांना देण्यात आले एबी फॉर्म
प्रभाग क्रमांक 54 – अंकित प्रभू
प्रभाग क्र. 59 – शैलेश फणसे
प्रभाग क्र. 60 – मेघना विशाल काकडे माने
प्रभाग क्र. 61 – सेजल दयानंद सावंत
प्रभाग क्र. 62 – झीशान चंगेज मुलतानी
प्रभाग क्र. 63 – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
प्रभाग क्र. 64 – सबा हारून खान
प्रभाग क्रमांक 40 – सुहास वाडकर
प्रभाग क्रमांक 206 – सचिन पडवळ
प्रभाग क्रमांक 93 – रोहिणी कांबळे
प्रभाग क्र. 100 – साधना वरस्कर
प्रभाग क्र. 156 – संजना संतोष कासले
प्रभाग क्र. 164 – साईनाथ साधू कटके
प्रभाग क्र. 168 – सुधीर खातू वार्ड
प्रभाग क्र. 124 – सकीना शेख
प्रभाग क्र. 127 – स्वरूपा पाटील
प्रभाग क्र. 89 – गितेश राऊत
प्रभाग क्र. 141 – विठ्ठल लोकरे
प्रभाग क्र. 142 – सुनंदा लोकरे
प्रभाग क्रमांक 137 – महादेव आंबेकर
प्रभाग क्र. 138 – अर्जुन शिंदे
प्रभाग 167 – सुवर्णा मोरे
प्रभाग 150 – सुप्रदा फातर्फेकर
प्रभाग क्र. 95 – चंद्रशेखर वायंगणकर
प्रभाग क्र. 215 – किरण बालसराफ
प्रभाग क्र. 218 – गीता अहिरेकर
प्रभाग क्र. 222 – संपत ठाकूर
प्रभाग क्र. 225 – अजिंक्य धात्रक
ठाकरे शिवसेनेने कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक 29 मधून शाखाप्रमुख सचिन पाटील यांना उमेदवारी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रभाग क्रमांक 3 मधील अधिकृत उमेदवार रोशनी (कोरे) गायकवाड यांना एबी फॉर्म देण्यात आला.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकालाचा गुलाल उधळला जाईल. मुंबईच्या या सत्तेच्या महासंग्रामात 'मातोश्री'ने घेतलेली ही आक्रमक भूमिका आणि 'मराठी महापौरा'चा दिलेला नारा मतदारांना किती आकर्षित करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा: Ernakulam Express Fire : मोठी बातमी! एर्नाकुलम एक्सप्रेसच्या एसी डब्यांना आग, Video Viral