मुंबई: येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त सभा होत असतानाच, ठाकरे गटाला दक्षिण मुंबईत मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेचे (उबाठा) जुने जाणते निष्ठावंत नेते आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांनी अखेर 'जय महाराष्ट्र' करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दगडू सकपाळ हे शिवसेनेचे केवळ माजी आमदारच नव्हते, तर लालबाग-परळ या बालेकिल्ल्यातील पक्षाचा मुख्य आधारस्तंभ होते. त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदाची मोठी जबाबदारी होती. मात्र, प्रभाग क्रमांक 203 मधून आपल्या मुलीला, रेश्मा सकपाळ यांना उमेदवारी न मिळाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नाराज होते. "मी म्हातारा झालो, आता पक्षाला माझा उपयोग वाटत नसेल, पण तारुण्यात मी पक्षासाठी रक्त सांडले आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली होती.
या नाराजीचा अचूक फायदा घेत एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी थेट सकपाळ यांच्या परळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीतच पक्षप्रवेशाची रणनीती ठरली होती. अखेर, ज्या दिवशी संपूर्ण जगाचे लक्ष ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्कवरील सभे कडे लागले आहे, त्याच दिवशी सकाळी 10 वाजता सकपाळ यांनी धनुष्यबाण हाती घेण्याचे निश्चित केले. यामुळे ठाकरेंच्या सभेपूर्वीच त्यांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे.
दगडू सकपाळ यांचा पक्षप्रवेश हा केवळ एका नेत्याचा प्रवेश नसून, शिवडी आणि परळ परिसरातील शिवसेनेच्या हक्काच्या मतपेढीला दिलेला धक्का मानला जात आहे. मुलीला तिकीट नाकारल्याने रेश्मा सकपाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आधीच चलबिचल होती. आता सकपाळ यांनीच साथ सोडल्याने, मुंबई पालिकेच्या सत्तेसाठी धडपडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकीकडे शिवाजी पार्कवर 'शिवशक्ती'च्या नावाने मोठी जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे ग्राउंड लेव्हलवरचे मोहरे गळत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. "एकीकडे भावनिक साद, तर दुसरीकडे प्रत्यक्ष गळती," अशा पेचात सध्या ठाकरे गट सापडला आहे. या पक्षबदलाचा परिणाम आगामी 15 जानेवारीच्या मतदानावर किती होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आजचा 'सुपर संडे' हा केवळ सभांचा संडे नसून, राजकीय फोडाफोडीचा आणि मोठ्या उलथापालथीचा दिवस ठरला आहे. निष्ठावंतांची साथ सुटणे हा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी खरोखरच 'मोठा धक्का' मानला जात आहे.