मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभारी निवडण्याचा क्षण अखेर जवळ आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी मुंबईकरांना आपल्या लोकशाहीचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केवळ सरकारी कार्यालयेच नव्हे, तर खाजगी कंपन्या आणि आयटी क्षेत्रालाही हा नियम लागू असणार आहे.
खाजगी कंपन्या आणि आयटी पार्कवर 'दक्षता पथका'ची नजर
अनेकदा खाजगी कंपन्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावतात, ज्यामुळे मतदानाची टक्केवारी घटते. मात्र, यावेळी प्रशासनाने कंबर कसली आहे. उद्योग आणि कामगार विभागाने काढलेल्या आदेशानुसार, सर्व आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, नाट्यगृहे आणि रिटेलर्सना ही सुट्टी देणे बंधनकारक आहे. जर एखाद्या कंपनीने सुट्टी नाकारली, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कामाच्या निमित्ताने शहराबाहेर असणाऱ्यांनाही दिलासा
ज्या मतदारांची नावे मुंबईच्या मतदार यादीत आहेत, परंतु जे कामाच्या निमित्ताने ठाणे, नवी मुंबई किंवा पालघरमध्ये कार्यरत आहेत, त्यांनाही या आदेशानुसार मतदानासाठी सुट्टी मिळणार आहे. सुट्टी देणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असलेल्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे मालकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीसाठी शहर आणि उपनगरांमध्ये विशेष 'दक्षता पथके' स्थापन केली आहेत. जर तुम्हाला मतदानासाठी सुट्टी नाकारली जात असेल, तर तुम्ही प्रशासनाशी थेट संपर्क साधू शकता.
तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक: 912231533187
आयुक्त भूषण गगराणींचे आवाहन
महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "मतदानाच्या दिवशी कामाच्या कारणाने कोणताही नागरिक आपल्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठीच सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईकरांनी या सुट्टीचा उपयोग करून घराबाहेर पडावे आणि आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करावे," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.