मुंबई: येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. 'दुबार मतदानाच्या' गंभीर मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट 'राडा' करण्याचे संकेत दिले आहेत. "दुबार मतदार दिसला की तिथेच फोडा," अशा शब्दांत अमित ठाकरेंनी घुसखोर आणि बोगस मतदारांना कडक इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार अद्यापही राज्यात 10 लाख 32 हजार दुबार नावे यादीत शिल्लक असून, मुंबईत हा आकडा सुमारे 1.7 लाखांच्या घरात असल्याने राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.
शिवाजी पार्कच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या महायुती आणि मनसे-शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पहाटे सहा वाजल्यापासून मतदान केंद्रावर सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. "ईव्हीएम मशीनवर तर लक्ष ठेवाच, पण एखादा दुबार मतदार सकाळी सात वाजता रांगेत दिसला तर त्याला तिथेच फोडा," असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.
राज ठाकरेंच्या या भूमिकेला अमित ठाकरे यांनीही तितक्याच जहाल भाषेत साथ दिली असून, "जर बाहेरील राज्यातील लोक येऊन महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार असतील, तर आम्ही आमचा मतदानाचा हक्क सोडायचा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या रणधुमाळीत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलेला इशारा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जाधव यांनी कार्यकर्त्यांना 'गोंद्या आला रे आला' हा सांकेतिक मेसेज देण्याची सूचना दिली आहे. "दुबार मतदार मतदान केंद्रावर दोन पायांनी चालत येईल, पण बाहेर पडताना मात्र तो स्ट्रेचरवरूनच जाईल," असे वादग्रस्त पण तितकेच आक्रमक विधान त्यांनी केले आहे. मनसेच्या या 'स्ट्रेचर' इशाऱ्यामुळे निवडणूक प्रशासन हादरले आहे.
40 लाख मतदार घुसवून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा गंभीर आरोप अमित ठाकरे यांनी केला आहे. यामुळे येत्या 15 जानेवारीला मतदान केंद्रांवर केवळ मतदानच होणार की कार्यकर्त्यांमध्ये जुंपणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 'मराठी अस्मिता' आणि 'मतातला पारदर्शकपणा' या दोन मुद्द्यांवर ही निवडणूक आता 'आरपारच्या' लढाईकडे झुकली आहे.