काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी मान्य केले की त्या काळी आंतरराष्ट्रीय दबाव, विशेषतः अमेरिकेच्या भूमिकेमुळे भारताने पाकिस्तानविरोधात थेट सैनिकी कारवाई केली नाही.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम म्हणाले की, हल्ल्यानंतर काही दिवसांतच तत्कालीन अमेरिकन परराष्ट्रमंत्री कोंडोलीजा राईस यांनी दिल्लीला भेट देऊन भारताला युद्ध छेडू नये, असे स्पष्ट सांगितले होते. त्यांच्या मते, त्या काळात संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय भारताला संयम बाळगण्याचे आवाहन करत होता. त्यांनी मान्य केले की त्यांच्या मनात बदलेच्या कारवाईचा विचार आला होता, मात्र शेवटी सरकारने सैनिकी पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतला.
चिदंबरम यांनी सांगितले की, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरकारमध्ये यावर सखोल चर्चा झाली होती. मात्र, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय परराष्ट्र सेवेच्या सूचनेनुसार पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करण्याचा पर्याय वगळण्यात आला.
26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या या हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस यांसारख्या ठिकाणी हल्ले केले. 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिलेल्या या भीषण दहशतवादी कारवाईत 166 लोकांचा बळी गेला, ज्यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले, तर जिवंत पकडलेल्या अजमल कसाबला 2012 मध्ये फाशी देण्यात आली.
या हल्ल्यानंतर तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला आणि चिदंबरम यांना वित्त खात्यातून गृहमंत्रालयात हलवण्यात आले. त्यांनी कबूल केले की या बदलामुळे ते समाधानी नव्हते, कारण निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना त्यांनी आधीच पाच अर्थसंकल्प सादर केले होते.
चिदंबरम यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले की, देशाला आधीपासूनच माहीत होते की काँग्रेस सरकारने परदेशी दबावाखाली मुंबई हल्ल्याचा गैरव्यवहार केला होता आणि आता त्याचा उघड कबूलनामा झाला आहे.