MSRTC Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला ‘कात्री’! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; तिकीट दरात वाढ, वाचा नवे दर

उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

MSRTC Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला ‘कात्री’! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; तिकीट दरात वाढ, वाचा नवे दर

मुंबई: उन्हाळ्याची सुट्टी लागली की नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात ते गावाकडचे. गावी जाण्यासाठी आजही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची पहिली पसंती असते ती सगळ्यांच्या हक्काच्या आणि लाडक्या 'लाल परी'ला. पण यंदा मात्र गावाकडची ही वाट थोडी खडतर आणि खिशाला अधिक झळ पोहोचवणारी ठरणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांच्या खिशाला थेट कात्री लावणारा निर्णय घेतला असून, एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ जाहीर केली आहे.

उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी आणि उत्पन्न वाढीचा प्रयत्न लक्षात घेता, एसटी महामंडळाने तिकीट दरात तब्बल 10 टक्क्यांची वाढ केली आहे. येत्या 15 एप्रिल 2026 पासून ही नवी भाडेवाढ संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे. त्यामुळे सुट्टीत कुटुंबासोबत गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागतील. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 90 ते 100 रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार थेट प्रवाशांच्या खांद्यावर पडणार असल्याने, यंदाचा गावाकडचा प्रवास चांगलाच खर्चीक ठरणार आहे.

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या की ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांची एसटी स्थानकांवर मोठी झुंबड उडते. एसटीचे जाळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, अगदी वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचले असल्याने आजही हजारो प्रवासी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित प्रवासाला पसंती देतात. महामंडळाच्या नियमावलीनुसार, गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपात तिकीट दर वाढवण्याचा अधिकार एसटी प्रशासनाला आहे. नेमक्या याच अधिकाराचा वापर करून ही 'हंगामी भाडेवाढ' लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Stock Market Today: दलाल स्ट्रीटवर दिवाळी! ट्रम्प यांच्या 'सीजफायर'ने सेन्सेक्स 2700 अंकांनी उफाळला; गुंतवणूकदारांनी काही मिनिटांत कमावले 14 लाख कोटी

ही भाडेवाढ प्रामुख्याने सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या 'साध्या बस'ला (लाल परी) लागू असेल. याशिवाय मिडी बस, जलद सेवा (Express) आणि रात्रसेवा देणाऱ्या गाड्यांसाठीही हे नवे दर आकारले जातील. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या बदलानंतर प्रौढ प्रवाशांसाठी बसचे भाडे प्रति टप्पा 12 रुपये, तर लहान मुलांसाठी प्रति टप्पा सात रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. यामुळे कुटुंबाचा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

या 10 टक्के दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशावर नेमका किती भार पडेल, हे काही उदाहरणांवरून स्पष्ट होते. मुंबईवरून कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसेल. पूर्वी परळ ते कोल्हापूर प्रवासासाठी 640 रुपये लागायचे, ते आता 704 रुपये होतील. तर, मुंबई ते कोल्हापूरसाठी 750 रुपयांऐवजी 825 रुपये मोजावे लागतील. मराठवाडा आणि कोकणच्या मार्गावरही हीच स्थिती आहे.

मुंबई ते लातूर हा प्रवास आता 900 रुपयांवरून थेट 1000 रुपयांच्या घरात गेला आहे. तर, चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुंबई ते रत्नागिरी या प्रवासासाठी 600 रुपयांऐवजी थेट 700 रुपये मोजावे लागणार आहेत. एकंदरीतच, खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला कंटाळून एसटीकडे वळणाऱ्या प्रवाशांना आता महामंडळाच्या या निर्णयामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आर्थिक फटका सहन करावा लागणार, हे मात्र निश्चित! 

हेही वाचा: Crime News: आधी विष दिलं अन् नंतर पुरावे जाळण्यासाठी खोलीला लावली आग; पत्नीनेच रचला पतीला संपवण्याचा कट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number