येत्या २८मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मात्र नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाणार नसल्याने विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. यासंदर्भात एक पत्रक विरोधकांनी जारी केले आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर विरोधकांचे चांगलेच कान टोचले. नवीन संसद भवन ही देशाची ताकद आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याकावीळ झाल्यासारखे वागणे बरोबर नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.
आम्ही नवीन संसद भवन बांधू, अशी ओरड सर्वचजण करत होते. कोणालाही नवीन घर बांधता आले नाही. मोदींनी ते करून दाखवले. जे लोक लोकशाहीला मानत नाही, ते लोकशाहीवर बोलत आहेत. सापनाथ, नागनाथ सब साथ आओ, अशी त्यांची अवस्था झाली आहे. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. तशी म्हण आहे. नाहीतर तुम्हा म्हणाल मी जाणीवपूर्वक कोणाला तरी बोलत आहे, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते संसद भवन बनवून दाखवले. त्यामुळे कुठेतरी पोटात दुखतंय आणि तेच दिसतं आहे. विरोधी पक्षांनी जो निर्णय घेतला आहे त्यावरुन हेच दिसतं आहे की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लोकशाहीमध्ये अशाप्रकारचे कावीळ झाल्यासारखे वागणे अत्यंत चूक आहे. नवीन संसद भवन हे देशाची शान आहे. जेवढ्या कमी वेळात हे तयार झाले आहे त्यामुळे देशाची ताकद दिसते आहे. जेवढ्या भव्यतेने हे संसद भवन तयार झालं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. मात्र मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणं सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत. यापूर्वी १९७५ ला लोकसभेच्या एनएक्स इमारतीचे उद्घाटन स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी केले होते. मग ते लोकशाही विरोधी होते का? यापूर्वी संसदेची जी भव्य लायब्ररी आहे त्याचं भूमिपूजन स्वर्गीय राजीव गांधींनी केले होते. ते लोकशाहीविरोधी होते का? अशा प्रश्नांची सरबत्ती फडणवीसांनी विरोधकांना केली.