MNS Chatrapati Sambhajinagar: ठाकरे युतीच्या जल्लोषात मिठाचा खडा! संभाजीनगर मनसेमध्ये मोठी गळती; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला असून जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह 30 ते 40 पदाधिकाऱ्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे.

MNS Chatrapati Sambhajinagar: ठाकरे युतीच्या जल्लोषात मिठाचा खडा! संभाजीनगर मनसेमध्ये मोठी गळती; नेमकं काय घडलं?

छत्रपती सांभाजीनगर: राज्याच्या राजकारणात बुधवारी एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती झाल्याने जल्लोश होत असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र मनसेला मोठा धक्का बसला आहे. संभाजीनगरमधील मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह सुमारे 30 ते 40 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केला आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला युतीची भाषा सुरू असतानाच दुसरीकडे कार्यकर्त्यांनी मात्र सत्ताधारी महायुतीची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. खांबेकर यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. "मला छत्रपती संभाजीनगरसाठी विकासाचे काम करायचे आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाची घोषणा केली. जिल्हाध्यक्षांच्या या अचानक झालेल्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक मनसे संघटना पूर्णपणे खिळखिळी झाली आहे.

हेही वाचा: Tamilnadu Accident News: तामिळनाडूत काळाचा घाला! बसचा टायर फाटल्याने भीषण अपघात; दोन लहान मुलांसह नऊ जणांचा मृत्यू

भारतीय जनता पक्षाने मनसेच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. मनसेचे शहराध्यक्ष गजन गौडा पाटील आणि आशिष सुरडकर यांच्यासह 30 ते 40 पदाधिकारी गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते. अखेर बुधवारी या सर्वांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शहर उपाध्यक्ष, सचिव आणि विभाग अध्यक्षांचा समावेश असून, या सर्वांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

एकीकडे मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असताना, मनसेचे काही निष्ठावान पदाधिकारी मात्र अजूनही पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत ठाम उभे असल्याचे चित्र आहे. राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, वैभव मिटकर आणि निखिल ताकवाले यांनी आपण शेवटपर्यंत मनसेतच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने आगामी काळात मनसेची छत्रपती संभाजीनगरमधील ताकद किती उरेल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या सर्व घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या युतीची चर्चा सुरू असली, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. सत्तेच्या समीकरणात स्वतःचे स्थान सुरक्षित करण्यासाठी अनेकजण महायुतीकडे आकर्षित होत आहेत. संभाजीनगरमधील हे पक्षांतर आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय बलाबल पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Karnataka Accident: महामार्गावर मृत्यूचं तांडव! ट्रकच्या धडकेनंतर बस जळून खाक; 10 जणांचा मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number