Raj Thackeray: शिवतीर्थावर आज ‘राज’गर्जना! ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिलाच गुढीपाडवा मेळावा; भाषणातून कोण होणार लक्ष्य?

मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

Raj Thackeray: शिवतीर्थावर आज ‘राज’गर्जना! ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिलाच गुढीपाडवा मेळावा; भाषणातून कोण होणार लक्ष्य?

मुंबई: चैत्र पालवी फुटली की संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागतात ते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे. मात्र, मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) दरवर्षी गुढीपाडव्याला एक वेगळाच राजकीय उत्साह ओसंडून वाहत असतो. यंदाचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी ‘गुढी’ उभारणारा ठरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या राजकीय सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या ‘राज’गर्जनेकडे लागलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडेच घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) नव्या राजकीय युतीनंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा आहे. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी कशा सामावल्या आहेत आणि या नव्या राजकीय समीकरणावर राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार? याची प्रचंड उत्सुकता राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये आहे.

या नव्या युतीचे राजकीय पडसाद कसे उमटणार, याची दिशा आजच्या भाषणातून स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे. “बाकी सविस्तर बोलूच, शिवतीर्थावर या”, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना केले आहे.

हेही वाचा: Indian Navy Security: सातासमुद्रापार भारताची ताकद! ओमानच्या आखातात तैनात झाल्या अतिरिक्त युद्धनौका; काय आहे नेमकं कारण?

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने झेपावले आहेत. ‘राज ठाकरेंचा’ विचार ऐकण्यासाठी शिवतीर्थावर जनसागर उसळणार, याचा अंदाज आल्याने मैदानावर भव्य तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

मात्र, यंदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते मैदानावर लावण्यात आलेल्या दोन विशेष महाकाय स्क्रीन्सनी! या स्क्रीन्सवर नेमका कोणाचा व्हिडीओ दाखवला जाणार? ठाकरे बंधूंच्या युतीचा एखादा विशेष संदेश असणार की विरोधकांचे वाभाडे काढणारी एखादी राजकीय क्लिप? या प्रश्नाभोवती सध्या सस्पेन्सचं वलय निर्माण झालं असून, तो या मेळाव्यातील सर्वात मोठा ‘क्लायमॅक्स’ ठरू शकतो.

राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक, मार्मिक आणि थेट शैलीसाठी ओळखले जातात. यापूर्वी पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत बैठकांमध्ये पक्षाच्या आगामी रणनीतीची ब्ल्यूप्रिंट आधीच तयार करण्यात आली आहे. आजच्या जाहीर मेळाव्यातून याच रणनीतीचा शंखनाद केला जाईल. ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे, पक्षाची पुढची वाटचाल काय असेल, निवडणुकांच्या रिंगणात कोणत्या नव्या राजकीय शस्त्रास्त्रांनिशी उतरायचे आहे, याचा स्पष्ट ‘कानमंत्र’ आज राज ठाकरे त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांना देणार आहेत.

एकीकडे मराठी नववर्षाचा उत्साह आणि दुसरीकडे शिवतीर्थावर घुमणारा राज ठाकरेंचा खणखणीत आवाज, असा दुहेरी संगम आज पाहायला मिळेल. नव्या युतीची ताकद, आगामी निवडणुकांचे रणशिंग आणि मनसेची पुढची राजकीय झेप, अशा अनेक ज्वलंत मुद्द्यांना आज स्पर्श केला जाईल. त्यामुळे संध्याकाळ होताच संपूर्ण महाराष्ट्राचे कान आणि डोळे केवळ दादरच्या शिवाजी पार्ककडे लागलेले असतील, यात शंका नाही!

हेही वाचा: US Iran Israel War: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा इस्रायलला थरकाप उडवणारा इशारा; ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्याचा वचपा काढणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number