लखनऊ: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या ‘करा किंवा मरा’ अशा निर्णायक सामन्यात मिचेल मार्शच्या फलंदाजीने नवा इतिहास रचला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला मार्शने एकहाती सावरले. पावसाच्या व्यत्ययामुळे 19 षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात मार्शने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या 20 चेंडूंमध्ये त्याचे अर्धशतक पूर्ण करत बंगळूर च्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. त्याच्या या वादळी खेळीमुळे लखनऊने 19 षटकांत 209 धावांचा डोंगराएवढा स्कोअर उभा केला.
पंतचा रेकॉर्ड मोडीत, मार्श ठरला नवा ‘किंग’
या खेळीदरम्यान मिचेल मार्शने लखनऊ सुपर जायंट्ससाठी सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा मान मिळवला आहे. त्याने रोमारियो शेफर्डच्या 14 व्या षटकात चौकार मारून 49 चेंडूंमध्ये त्याचे शतक पूर्ण केले. यापूर्वी हा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर होता, ज्याने 54 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. मार्शने केवळ 49 चेंडूत शंभरचा आकडा पार करत लखनऊच्या इतिहासात त्याचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. मार्शचे हे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले आहे.
पावसाचा खेळ अन् मार्शची आतषबाजी
लखनऊध्ये काल वरुणराजाने अनेकदा हजेरी लावली, ज्यामुळे खेळ वारंवार थांबवावा लागला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पहिल्यांदा पाऊस आला आणि त्यानंतर एका षटकाची कपात करून सामना 19 षटकांचा करण्यात आला. मात्र, पावसाच्या व्यत्ययाचा मार्शच्या एकाग्रतेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने 56 चेंडूंच्या त्याच्या खेळीत 9 उत्तुंग षटकार आणि 9 चौकार मारत 111 धावांची अविस्मरणीय खेळी केली. विशेष म्हणजे, त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या.
??????. ?????????. ????? ? Mitchell Marsh is the Player of the Match for his display of sheer power during a knock of 1️⃣1️⃣1️⃣(56) ? WATCH his innings ▶️ https://t.co/7BZBAGMWOB#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRCB | @LucknowIPL pic.twitter.com/oHZhkZ8HP6 — IndianPremierLeague (@IPL) May 7, 2026
केएल राहुलच्या विक्रमाशी बरोबरी
मिचेल मार्श आता लखनऊ सुपर जायंट्ससाठी संयुक्तपणे सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. याआधी कर्णधार केएल राहुलने या संघासाठी दोन शतके झळकावली होती, आता मार्शच्या नावावरही दोन शतके जमा झाली आहेत. सलामीला आलेल्या कुलकर्णीने एका बाजूने संथ फलंदाजी केली असली, तरी मार्शने दुसऱ्या बाजूने आक्रमक फलंदाजी करत डावाला गती दिली. जेव्हा दुसऱ्यांदा पाऊस थांबून खेळ सुरू झाला, तेव्हा मार्श बाद झाला, पण तोपर्यंत त्याने संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले होते.
आरसीबीची झुंज अपयशी, लखनौचा विजय
डकवर्थ लुईस नियमानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला विजयासाठी 19 षटकांत 213 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते. आरसीबीच्या फलंदाजांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेरच्या चेंडूपर्यंत लढा दिला. मात्र, लखनऊच्या अचूक गोलंदाजीसमोर बेंगळुरूचा संघ 19 षटकांत 203 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयामुळे लखनऊने स्पर्धेतील त्याची दावेदारी अधिक भक्कम केली आहे, तर आरसीबीला या पराभवामुळे मोठा धक्का बसला आहे.