नागपूर : सध्या राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीवरून खलबतं सुरू असून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटलेला नाही. अद्याप महायुतीकडून जागावाटप जाहीर झाले नसून पक्षश्रेष्ठींची वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद निवडणुकीबाबत सूचक वक्तव्य केले आहे. बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलताना सांगितले की, महायुतीची विधानपरिषद जागावाटपबाबतची चर्चा 99 टक्के पूर्ण झाली आहे. फक्त तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांना बसून निर्णय अंतिम करायचं आहे. महायुतीचा जागावाटप उद्यापर्यंत अधिकृतपणे जाहीर होईल. महायुतीच्या जागावाटपबद्दल बैठकीची दिल्लीत गरज नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि दोन्ही मित्र पक्षातील नेते आपापसात बसून निर्णय करू शकतील. उद्यापर्यंत महायुतीच्या जागा जाहीर होतील.
तसेच बावनकुळे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अश्लील टीका करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मूर्खपणा, नीचपणा आणि नालायकपणाचे वक्तव्य केले आहे. सपकाळ यांची राजकीय उंची किती आणि कोणावर बोलत आहे याचे भान त्यांनी ठेवावे. सपकाळ यांनी यानंतर अशा पद्धतीची अश्लील भाषा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री संदर्भात केली तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. सपकाळच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश निर्माण होईल.