इराण: मध्यपूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र होत चालला असून युद्धाचा आज पंधरावा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच असल्याने परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बहल्ल्यांपैकी एक कारवाई केली. या हल्ल्यात इराणमधील खर्ग आयलंडवरील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दुसरीकडे इराणनेही तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिका आणि इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की त्यांच्या देशातील प्रत्येक मृत्यूचा बदला घेतला जाईल. त्यामुळे या संघर्षाचा विस्तार आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-7 देशांच्या नेत्यांशी झालेल्या डिजिटल बैठकीतही या कारवाईचा उल्लेख केला. त्यांनी इराण लवकरच शरणागती पत्करेल असा दावा करत ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ यशस्वी ठरल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी या कारवाईला “जगासाठी धोका ठरणाऱ्या समस्येपासून मुक्तता” असे वर्णन केले असल्याचेही वृत्त आहे.
मात्र जी-7 देशांच्या नेत्यांनी युद्ध लवकर थांबवण्याचे आवाहन केले आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत युद्धामुळे जागतिक अस्थिरता वाढू शकते, अशी चिंता व्यक्त केली. तसेच या संघर्षाचा फायदा घेऊन रशियाला निर्बंधांमधून सूट मिळू नये, याची काळजी घेण्याचीही सूचना त्यांनी केली.
या घडामोडींमध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताज्या वृत्तानुसार इराकची राजधानी बगदाद येथे असलेल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. दूतावासाच्या परिसरातून धूर निघताना दिसल्याची माहिती मिळाली असून या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मध्यपूर्वेतील या वाढत्या संघर्षामुळे जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार आणि सुरक्षा परिस्थितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी सध्या तरी या संघर्षाच्या समाप्तीची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत.