मेघालयची राजधानी शिलाँग येथील लोकसभा खासदार डॉ. रिकी एजे सिंगकॉन (Dr. Ricky Andrew J Syngkon) यांचे गुरुवारी सायंकाळी अचानक निधन झाले. मित्रांसोबत फुटबॉल खेळताना मैदानातच त्यांना अचानक अस्वस्थ वाटून ते कोसळले. अवघ्या 54 व्या वर्षी त्यांच्या निधनामुळे मेघालयच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीचे प्रतिनिधित्व करणारे सिंगकॉन यांना तत्काळ जवळील कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे नेण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढे जयाव येथील डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र रात्री सुमारे 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शिलाँग लोकसभा मतदारसंघाचे (Shillong Parliamentary Constituency) प्रतिनिधित्व करणारे डॉ. सिंगकॉन हे जनसंपर्क आणि तळागाळातील कामासाठी ओळखले जात होते. खासकरून खासी-जैंतिया हिल्स भागात त्यांनी सातत्याने लोकांशी संपर्क ठेवत विकास आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावली होती.
त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या सार्वजनिक सेवाभावाचे स्मरण केले. “मेघालयच्या जनतेसाठी केलेल्या समर्पित कार्यामुळे त्यांची कायम आठवण राहील,” अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केले. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनीही सिंगकॉन यांना समर्पित, संवेदनशील आणि जनतेप्रती निष्ठावान नेता असल्याचे म्हटले.
Saddened by the passing of Lok Sabha MP from Shillong, Dr. Ricky AJ Syngkon. He will be remembered for his dedicated service to the people of Meghalaya. My thoughts are with his family, friends and supporters during this difficult time. May his soul rest in peace. — Narendra Modi (@narendramodi) February 20, 2026
उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसॉंग, व्हीपीपी अध्यक्ष आर्डेंट मिलर बसायावमोईत तसेच अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अकस्मात निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. रिकी सिंगकॉन यांची एप्रिल 2024 मध्ये लोकसभेसाठी निवड झाली होती. त्यांनी एकूण 10,33,251 मतांपैकी 5,71,078 मते मिळवत इंडियन नॅशनल काँग्रेसचे तीन वेळा खासदार राहिलेले व्हिन्सेंट एच. पाला यांचा स्पष्ट फरकाने पराभव केला होता. अल्पावधीतच प्रभावी नेतृत्वाची छाप पाडणाऱ्या या नेत्याच्या निधनाने मेघालयने एक सक्रिय लोकप्रतिनिधी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.