विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. याचप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
५ जुलै रोजी मविआ सरकारने भाजपच्या १२ आमदारांना पुढील एका वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिष शेलारांनी सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद व्यक्त केले आहे. मात्र, राज्यसरकारच्या अहंकारामुळे आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याची टीका शेलारांनी लगावली आहे.
मविआ सरकारने भाजप आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेतल्यामुळे देशभरात महाराष्ट्राची चर्चा झाली. मविआ सरकारचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आमदारांचा निलंबनाचा निर्णय असंविधानिक असल्याचे आशिष शेलारांनी सांगितले आहे. तसेच संविधानाच्या निर्णयाचा अर्थ लावण्याची जागा विधिमंडळ नसून यामुळेच राज्यात अराजकता माजली आहे, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.